Kolhapur Politics: ‘अजितदादांचा’ स्टेटस लागला; राहुल पाटलांच्या प्रवेशाचा विषय रंगला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 16:17 IST2025-07-24T16:16:49+5:302025-07-24T16:17:15+5:30
प्रवेशावरुन पाटील गटात दोन मतप्रवाह

Kolhapur Politics: ‘अजितदादांचा’ स्टेटस लागला; राहुल पाटलांच्या प्रवेशाचा विषय रंगला
कोल्हापूर : काँग्रेसचे नेते, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाची चाचपणी सुरू केली आहे. मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे स्टेटस पाटील यांच्यासह त्यांच्या समर्थकांनीही लावले होते. याची करवीर, राधानगरी तालुक्यात जोरदार चर्चा सुरू असून, ‘दादांचे स्टेटस लागले; भय्यांचा’ प्रवेश निश्चित, अशी जोरदार चर्चा झाली.
राहुल पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाची चर्चा विधानसभा निवडणुकीच्या निकालापासून सुरू आहे. गेल्या आठ-दहा दिवसांपासून चर्चेला उधाण आले असून, प्रवेशावरून त्यांच्या गटात दोन मतप्रवाह आहेत. त्यांनी प्रवेश करणार असे जाहीर केले नसले तरी ते करवीर व राधानगरीतील गटातील प्रमुखांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. सगळ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यायचा, या उद्देशाने राहुल पाटील यांची सध्या संपर्क मोहीम आहे. तत्पूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे स्टेटस त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या मोबाइलला झळकल्याने त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाला बळ आले आहे.
‘पी. एन.’ यांचा संयम आणि ताकद
दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांनी आयुष्यात सहा वेळा विधानसभेची निवडणूक लढवली, त्यात दोनच वेळा विजय मिळाला. चार टर्म म्हणजेच वीस वर्षे आमदारकी नसताना आपला गट एकसंध ठेवून जिल्ह्यात वजन कायम ठेवले होते. पक्षनिष्ठा हाच त्यांच्या राजकीय जीवनाचा अविभाज्य भाग राहिला. परंतु, राहुल पाटील हे मात्र एकाच पराभवानंतर अस्वस्थ झाले आहेत. त्यांनी किमान पाच वर्षे तरी संयम ठेवून काम करावे, अशी काही पदाधिकाऱ्यांची अपेक्षा आहे.
बहुतांशी पक्षांतराची इच्छा
करवीर, पन्हाळा, राधानगरी तालुक्यातील बहुतांशी पदाधिकाऱ्यांची पक्षांतराची इच्छा असल्याचे सांगितले जात असले तरी ते आयुष्यभर काँग्रेसच्या हातासोबत राहिले, त्या सामान्य कार्यकर्त्यांत मात्र अस्वस्थता दिसते. या घडामोडीमागे कारखान्याचे अर्थकारण, गोकुळमध्ये सत्तारुढ पॅनेलमध्ये संधी, असेही काही पदर आहेत.
जिल्हा बँकेचे संचालक राजेश पाटील हे बाहेरगावी आहेत. ते आज गुरुवारी येणार आहेत. त्यानंतर आमदार सतेज पाटील यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. आम्ही अजून कार्यकर्त्यांशी चर्चा करत आहोत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणे यात गैर काय ? - राहुल पाटील, माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद, कोल्हापूर