Kolhapur ZP Election Results 2026: तेल लावलेल्या पैलवांनानी अखेर जिंकून दाखवलचं; सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांनी मैदान मारले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 13:57 IST2026-02-10T13:57:02+5:302026-02-10T13:57:27+5:30
विनय कोरे गटाची गणिते बिघडली

Kolhapur ZP Election Results 2026: तेल लावलेल्या पैलवांनानी अखेर जिंकून दाखवलचं; सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांनी मैदान मारले
शरद यादव
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या मैदानात काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील व हसन मुश्रीफ यांनी लक्षवेधी विजय मिळवत जिल्ह्याच्या राजकारणात आपण धुरंधर असल्याचे दाखवून दिले आहे. तेल लावलेले पैलवान म्हणून बंटी पाटील, हसन मुश्रीफ व विनय कोरे यांची ओळख आहे. मैदान कितीही अवघड असले तरी निसटायचे कसे, हे त्यांना चांगले माहीत आहे. या निवडणुकीत बंटी व मुश्रीफ यांनी शेवटचा डाव टाकत विरोधकांना अस्मान दाखवले.
काँग्रेस - राष्ट्रवादी एकत्र असताना जिल्ह्यात बंटी-मुश्रीफ यांचा दोस्ताना चांगला सुरू होता. महापालिकेपासून गोकुळपर्यंत व जिल्हा बँकेपासून जि.प.पर्यंत प्रत्येक निवडणुकीत हे दोन्ही नेते एकत्र येत सत्ता हस्तगत करत हाेते. राज्यातील समीकरणे बदलल्यानंतर प्रथमच या दोस्तीत दरी निर्माण झाली. नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीत बंटी पाटील यांनी एकट्यानेच लढाई केली त्यांना मुश्रीफ यांची साथ मिळाली नाही.
नंतर झालेल्या काेल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत महायुती म्हणून मुश्रीफ विरोधात लढल्यामुळे पुन्हा बंटी पाटील एकटे पडले. परंतु त्यांनी हीच संधी समजून जोरदार किल्ला लढविला. मी एकटा लढत आहे मला साथ द्या, या त्यांच्या आवाहनाला कोल्हापूरकरांनी प्रतिसाद देत तब्बल ३४ जागी काँग्रेसला संधी दिली. या निवडणुकीवरून एकटं पडलं की कोल्हापूरकर साथ देतं सोडत नाहीत, हे बंटी पाटील यांच्या लक्षात आल्यानेच त्यांनी जि.प.साठी हाच पॅटर्न कायम ठेवला. निकालानंतर बंटी यांना कोल्हापूरच्या ग्रामीण भागानेही जोरदार हात दिल्याचे दिसून आले. यातून सतेज यांनी आपण कसलेले पैलवान आल्याचे सिद्ध केले आहे.
ऐन प्रचाराच्या भरात अजित पवार यांचे अपघाती निधन झाले. हा धक्का पचवत मंत्री मुश्रीफ यांनी प्रचाराचे एकहाती नियत्रंण करत जिल्हा परिषदेमध्ये घवघवीत यश खेचून आणले. पवार यांच्या निधनाची सहानभूतही मिळाली; परंतु ज्या तडफेने मुश्रीफ यांनी जोडण्या लावता ते पाहता राजकारणातील वस्ताद आपला शेवटचा डाव वेळ आल्यावर कसे टाकताे, हे राष्ट्रवादीच्या विजयाने दिसून आले.
खवण्याने ३४ जागा जिंकल्यात... वाक्याची जादू
जि.प. निवडणुकीच्या प्रचारात बंटी पाटील यांनी सभांनी जिल्हा अक्षरश: पिंजून काढला. मी कोल्हापूर महापालिकेत एकटा लढलो, तरी या खवण्याने ३४ जागा निवडून आणल्या. या निवडणुकीतही मी एकटा आहे मला साथ द्या, हे पाटील कुणाला घाबरत नाही, अशी त्यांची भावनिक साद मतदारांना अपिल करणारी ठरली. घसा शब्दश: बसला असताना त्यांनी प्रचाराचा लावलेला धडाका सामान्यांना आपला वाटला.
विनय कोरे गटाची गणिते बिघडली
प्रत्येक निवडणुकीत आपले वेगळे अस्तित्व विनय कोरे यांनी दाखवूव दिले आहे. परंतु या निवडणुकीत होमपिच असलेल्या पन्हाळ्यात जनसुराज्यची पाटी कोरीच राहिली तर घुणकी, भादोले हे गडही ढासळले. शाहुवाडीतही दोन जागा गेल्याने कोरे यांना मोठा धक्का मानला जात आहे. भाकरी फिरवण्यात कोरे यांची झालेली चूकच नडली असल्याचे निकालावरून दिसून येते.