Kolhapur: काँग्रेस धोकेबाज, त्यांच्यापासून सावध रहा - एकनाथ शिंदे; हातकणंगले नगरपंचायतीच्या प्रचारार्थ रोड शो
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 15:45 IST2025-11-24T15:43:44+5:302025-11-24T15:45:03+5:30
Local Body Election: 'लाडक्या बहिणींनो, अजिबात चिंता करू नका, तुमचा भाऊ सत्तेत आहे तोपर्यंत तुमचा एकही रुपया थांबणार नाही'

Kolhapur: काँग्रेस धोकेबाज, त्यांच्यापासून सावध रहा - एकनाथ शिंदे; हातकणंगले नगरपंचायतीच्या प्रचारार्थ रोड शो
हातकणंगले : नगरपंचायतीच्या जागा आहेत सतरा, त्यामुळे विरोधकांना आहे खतरा.. काँग्रेस धोकेबाज आहे; त्यांच्यापासून सावध राहा. या निवडणुकीत विरोधकांना पाणी पाजा, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. हातकणंगले नगरपंचायत निवडणुकीसाठी शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित रोड शोमध्ये बोलत होते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बाबूजमाल तालीम चौकात सभाही झाली. शिंदे म्हणाले, ‘बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला शिकवलय की शब्द देताना दहा वेळा विचार करा आणि एकदा दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्या. लाडक्या बहिणींनो, अजिबात चिंता करू नका, तुमचा भाऊ सत्तेत आहे तोपर्यंत तुमचा एकही रुपया थांबणार नाही. मी एकदा कमेंट केले की, ते मी पाळतो; त्यावेळी मी स्वतःचेही ऐकत नाही. एकनाथ शिंदे हा करून दाखवणारा माणूस आहे. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा.’
‘विरोधक पाणी योजनेचा जीआर खोटा असल्याची अफवा पसरवत आहेत, त्यांनी आयुष्यभर भ्रष्टाचार करून लुटमार केली आहे. तीन तारखेला गुलाल उधळण्यासाठी मी स्वतः तुमच्यामध्ये सहभागी होणार आहे.’ यावेळी खासदार धैर्यशील माने, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, माजी आमदार सुजित मिणचेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने, इचलकरंजी शहराध्यक्ष भाऊसो आवळे, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अजित पाटील, आदी उपस्थित होते.