कोल्हापुरात सतेज पाटलांना धक्का, काँग्रेसचा गटनेता शिंदेसेनेच्या गळाला; मुंबईत घेतली एकनाथ शिंदेंची भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 16:16 IST2025-06-06T16:11:14+5:302025-06-06T16:16:05+5:30
पंधरा वर्षांची पक्षनिष्ठा संपुष्टात

कोल्हापुरात सतेज पाटलांना धक्का, काँग्रेसचा गटनेता शिंदेसेनेच्या गळाला; मुंबईत घेतली एकनाथ शिंदेंची भेट
कळंबा : गेली पंधरावर्षे काँगेस पक्षाशी एकनिष्ठ असणारे महापालिकेतील गटनेते, माजी नगरसेवक शारंगधर देशमुख यांनी आज, शुक्रवारी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीतून नाराज देशमुख लवकरच शिंदे गटात प्रवेश करण्याचे स्पष्ट झाले. दक्षिण विधानसभा मतदारसंघात आमदार सतेज पाटील गटाला हा मोठा धक्का मानला जातो.
यावेळी आरोग्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार राजेश क्षीरसागर, माजी खासदार संजय मंडलिक, सत्यजित कदम उपस्थित होते. शारंगधर देशमुख यांनी गेली पंधरा वर्षे काँग्रेसचे पालिकेतील नेतृत्व यशस्वीरित्या सांभाळले होते. दोन वेळा सानेगुरुजी वसाहत तर गतवेळी रंकाळा तलाव प्रभागातून शारंगधर देशमुख सलग तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले. पालिकेत काँग्रेसचा गटनेता, स्थायी समिती सभापती अशी पदे भूषवली आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर उत्तर मतदार संघातून काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. परंतु पक्षाने दखल घेतली नसल्याने ते नाराज झाले होते. अखेर आज त्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतल्याने ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले.