परीक्षेतील समन्वयाचा गोंधळ थांबणार!

By Admin | Updated: August 30, 2015 23:45 IST2015-08-30T23:45:50+5:302015-08-30T23:45:50+5:30

शिवाजी विद्यापीठाचे पाऊल : परीक्षा विभागात नव्या ‘आयटी’ विभागाचा प्रारंभ

The confusion of the test will stop! | परीक्षेतील समन्वयाचा गोंधळ थांबणार!

परीक्षेतील समन्वयाचा गोंधळ थांबणार!

कोल्हापूर : परीक्षा विभाग, संगणक केंद्र आणि एमकेसीएल अशा तीन वेगवेगळ्या विभागांतून शिवाजी विद्यापीठाचे परीक्षाविषयक कामकाज चालत होते. त्यामुळे अनेकदा येथील प्रक्रियेतील समन्वयाचा गोंधळ निर्माण व्हायचा. मात्र, आता ते थांबणार आहे. कारण, विद्यापीठ प्रशासनाने परीक्षा विभागात स्वतंत्र असा माहिती व तंत्रज्ञान (आयटी) आणि संगणकीयदृष्टीने परीक्षेचे कामकाज करणारा विभाग सुरू केला आहे.विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचनेनुसार विद्यापीठाने १९९५ च्या सुमारास संगणक केंद्राची निर्मिती केली. या केंद्राचा उद्देश विद्यापीठ कामकाजासाठी आवश्यक संगणकीय प्रणाली विकसित करणे आणि परीक्षाविषयक कामकाजाला साहाय्य करणे असा होता. काही वर्षांनंतर या केंद्रावर परीक्षा विषयक कामकाजाची अतिरिक्त जबाबदारी पडली. वार्षिक पद्धतीने परीक्षा होत असताना केंद्राने उल्लेखनीय काम केले. मात्र, सत्र पद्धतीच्या परीक्षांमुळे केंद्रावरील कामकाजाचा ताण वाढला तसेच हे केंद्र, एमकेसीएल आणि परीक्षा विभाग अशा तीन स्वतंत्र विभागांकडून परीक्षाविषयक कामकाज होऊ लागले. त्यांचा फटका समन्वयाला बसला आणि कामकाजात गोंधळ सुरू झाला. वास्तविकपणे परीक्षाविषयक कामकाज एकाच छताखाली होणे आवश्यक होते. त्यानुसार परीक्षा नियंत्रक महेश काकडे यांनी प्रशासनाला प्रस्ताव सादर केला. हा प्रस्ताव आणि त्याचे महत्त्व लक्षात घेऊन कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी परीक्षा विभागात नवा आयटी विभाग सुरू करण्याचा निर्णय घेऊन कार्यवाही सुरू केली. त्याला व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली आहे. या नव्या विभागासाठी सध्या संगणक केंद्रात परीक्षाविषयक कामकाज करणाऱ्या सहा कर्मचाऱ्यांची परीक्षा विभागात नियुक्ती केली तसेच या विभागाची जबाबदारी परीक्षा नियंत्रकांवर सोपविली. या नव्या विभागाच्या कामकाजाला गेल्या सहा दिवसांपासून प्रारंभ झाला आहे. (प्रतिनिधी)


कार्यक्षमता, गती वाढणार...
परीक्षेचे कामकाज तीन विभागांकडून चालत होते. त्यात काहीवेळा संबंधित विभाग एखाद्या कामाला विलंब लागल्यास एकमेकांकडे बोट दाखवत होते. मात्र, आता परीक्षाविषयक सर्व कामकाजांची जबाबदारी परीक्षा विभागावर असल्याने आता त्याला लगाम बसणार आहे. शिवाय निकालातील दुरूस्ती तसेच अन्य बाबींसाठी विद्यार्थ्यांची होणारी धावपळ थांबणार आहे. संगणक केंद्र व एमकेसीएलकडे असलेली परीक्षाविषयक माहिती नव्या विभागात संकलित केली जाणार आहे. यासाठी मुख्य व्यवस्थापकीय अधिकारीपदी मिलिंद जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
५६४ परीक्षा, ६५०० प्रश्नपत्रिका
परीक्षा विभागातर्फे मार्च-एप्रिल आणि आॅक्टोबर-नोव्हेंबर या सत्रात विविध अभ्यासक्रमांच्या एकूण ५६४ परीक्षा घेतल्या जातात. यासाठी ६५०० प्रश्नपत्रिकांची छपाई केली जाते. सत्र पद्धतीमुळे परीक्षा विभागाचे कामकाज वर्षभर चालते. ते लक्षात घेऊन या विभागात नवा आयटी विभाग सुरू केल्याबद्दल शिक्षक, कर्मचाऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.

Web Title: The confusion of the test will stop!