Kolhapur-Shivaji University Convocation Ceremony: पदवी हातात, नाव दुसऱ्याचे, फोटो तिसऱ्याचाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 12:01 IST2025-12-25T12:01:31+5:302025-12-25T12:01:55+5:30
अर्ज बरोबर असूनही चुका कशा

Kolhapur-Shivaji University Convocation Ceremony: पदवी हातात, नाव दुसऱ्याचे, फोटो तिसऱ्याचाच
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात पदवी प्रमाणपत्रांतील चुकांमुळे विद्यार्थ्यांचा चांगलाच गोंधळ उडाला. प्रमाणपत्रातील नावाच्या स्पेलिंगमध्ये चुका झाल्या असून, कोणाचा फोटोच चुकला आहे. तसेच काहींचे तर उत्तीर्ण झाल्याचे वर्षच चुकल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. पदवी प्रमाणपत्र घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना चुकीच्या दुरुस्तीचा अर्ज भरण्यात वेळ गेला. त्यामुळे या विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. विशेष म्हणजे, पदवी प्रमाणपत्रात चुका असल्याने विद्यार्थ्यांना दुसऱ्याचे प्रमाणपत्र घेऊन फोटो काढण्याची वेळ आली.
शिवाजी विद्यापीठाचा ६२वा दीक्षांत समारंभ बुधवारी झाला. पदवी प्रमाणपत्र मिळणार असल्याने विद्यार्थी आनंदात होते. रांगेत उभे राहून पदवीही घेतली; परंतु पदवी प्रमाणपत्र पाहिल्यावर मात्र नावात चूक असल्याचे अनेकांच्या लक्षात आले. काही विद्यार्थ्यांचा तर फोटोच बदलला होता. तर काही विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रावर उत्तीर्ण झाल्याचे साल चुकले होते. अनेक विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्रात चुका असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी परीक्षा विभागाकडे तक्रार केली असता विद्यापीठाने अर्ज भरून घेत आठ दिवसांत प्रमाणपत्रांतील चुकांची दुरुस्ती करून देणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
वाचा - संरक्षण क्षेत्राच्या उद्योगात कोल्हापूरला अनेक संधी: डॉ. जी. सतीश रेड्डी
अर्ज बरोबर असूनही चुका कशा
पदवी प्रमाणपत्र मिळण्यासाठी दोन महिने अगोदर अर्ज भरून घेतला होता. पाचशे ते दीड हजार रुपयांपर्यंत शुल्कही भरून घेतले आहे. तरीही पदवी प्रमाणपत्रात चुका कशा घडल्या, असा सवाल उपस्थित होत आहे. काही विद्यार्थ्यांनी अर्ज भरल्याची प्रिंट दाखवल्यानंतर विद्यापीठाची चूक असल्याचे निदर्शनास आले.
स्वायत्त महाविद्यालयाकडून आलेल्या पदवी प्रमाणपत्रातील अर्जात चुका झाल्या आहेत. त्यामुळे पदवी प्रमाणपत्रात चुका आढळून आल्या आहेत. पदवी प्रमाणपत्रात चुका झाल्या असतील तर विनामूल्य दुरुस्ती करून देणार आहे. - डॉ. अजितसिंह जाधव, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, शिवाजी विद्यापीठ