कोल्हापुरात स्टाफ सिलेक्शन परीक्षेवेळी संगणक प्रणालीशी छेडछाड; हरयाणा, दिल्लीच्या तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 12:31 IST2025-09-26T12:29:12+5:302025-09-26T12:31:14+5:30
परीक्षेमध्ये काहीजणांकडून पैसे घेऊन त्यांना उत्तीर्ण करण्यासाठीचा हा प्रकार होता का याची तपासणी आता पोलिस करत आहेत

संग्रहित छाया
कोल्हापूर : स्टाफ सिलेक्शनच्यावतीने घेण्यात आलेल्या ‘कम्बाईनड ग्रॅज्युएट लेव्हल' अर्थात सीजीई परीक्षेवेळी संगणक प्रणालीत छेडछाड करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे. यातील एक हरयाणामधील असून दोघे दिल्लीचे आहेत. या परीक्षेमध्ये काहीजणांकडून पैसे घेऊन त्यांना उत्तीर्ण करण्यासाठीचा हा प्रकार होता का याची तपासणी आता पोलिस करत आहेत.
केंद्रीय मंत्रालयातील गट ‘ब’ आणि गट‘क’च्या अधिकाऱ्यांची भरती या परीक्षेव्दारे करण्यात येते. फुलेवाडी येथील कोतवालनगरमधील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गेल्या रविवारी ही परीक्षा घेण्यात येत होती. या ठिकाणी या तिघांनी तीन लॅपटॉप नेऊन परीक्षा हॉलमधील सर्व्हरची केबल लॅपटॉपना जोडली.
या कृत्याव्दारे संगणक नेटवर्क प्रणालीमध्ये छेडछाड करण्याचा हा प्रकार लक्षात आल्यानंतर पांडुरंग गोविंद पाटील (वय ५७, रा. आपटेनगर, कोल्हापूर) यांनी याबाबत जुना राजवाडा पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल होऊन या तिघांनाही अटक करण्यात आली.
अटक केलेल्यांमध्ये हर्ष राजेंद्र भारव्दाज (वय २१, रा. बहू अकबरपूर, ता. जि. रोहतक, हरयाणा), हर्ष राजेंद्रकुमार (२१, रा. शेरलिंग पार्क, सुलतानपुरी, नवी दिल्ली), अभिषेक संतोषकुमार प्रजापती (२१, बेगम विहार, बेगमपूर, नवी दिल्ली) यांचा समावेश आहे.
गोविंद पाटील हे इडीकोटी कंपनीत व्हेन्यू मॅनेजर आहेत. केंद्र शासनाच्या विविध ऑनलाईन परीक्षा घेण्याचा ठेका या कंपनीकडे आहे. सीजीई २०२५ या परीक्षेसाठी दिल्ली येथील ठेकेदार मोहन शर्मा यांनी हे कॉम्प्युटर ऑपरेटर पुरवले आहेत. यातील तिघांनी हा कारभार केला असून पोलिस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विशाल पाटोळे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.