Kolhapur: उपचारात हलगर्जीपणाची तक्रार; तीन तास मृतदेह पडून, सीपीआरमध्ये काही काळ तणाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 16:23 IST2025-08-06T16:23:22+5:302025-08-06T16:23:32+5:30
सीपीआरमध्ये रुग्णाच्या नातेवाईकांचा ठिय्या

Kolhapur: उपचारात हलगर्जीपणाची तक्रार; तीन तास मृतदेह पडून, सीपीआरमध्ये काही काळ तणाव
कोल्हापूर : अपघात गंभीर जखमी झालेल्या रुग्णावर उपचार करण्यात हलगर्जीपणा केल्याची तक्रार करत सीपीआरमध्ये रुग्णाच्या नातेवाईकांनी तीन तास ठिय्या मारला. मृतदेह स्वीकारण्यास नकार दिल्याने काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली. अखेर पोलिस आणि आरोग्यसेवक बंटी सावंत यांनी समजूत काढल्यानंतर नातेवाईकांनी शहिदा जहाँगीर नाकाडे (वय ५८, रा. तिसंगी, ता. गगनबावडा) यांचा मृतदेह स्वीकारला. ही घटना मंगळवारी (दि. ५) दुपारी घडली.
सीपीआरमधून मिळालेल्या माहितीनुसार, शहिदा नाकाडे या २६ जूनला तिसंगी येथे दुचाकीस्वाराच्या धडकेत जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना सीपीआरमध्ये दाखल करण्याचा सल्ला खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी दिला. त्यानुसार नातेवाईकांनी मंगळवारी दुपारी शहिदा यांना सीपीआरच्या अपघात विभागात दाखल केले.
मात्र, गर्दी असल्याने सुमारे अर्धा तास त्यांना बाहेरच स्ट्रेचरवर ठेवावा लागला. नातेवाईकांनी जबरदस्तीने त्यांना आत नेले. त्यानंतर काही वेळातच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रुग्ण पोहोचताच त्याची तपासणी केली नाही. त्याला ऑक्सिजन देण्याची व्यवस्था केली नाही. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्ण दगावल्याचा आरोप करत नातेवाईकांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. गगनबावडा पंचायत समितीचे माजी सभापती बंकट थोडगे यांनी सीपीआरमधील जबाबदार अधिकाऱ्यांनी याची दखल घ्यावी, असा आग्रह धरला.
नातेवाईकांनी अपघात विभागासमोर ठिय्या मारल्याची माहिती मिळताच लक्ष्मीपुरी पोलिसांनी धाव घेतली. आरोग्यसेवक बंटी सावंत आणि सहायक पोलिस निरीक्षक दिगंबर गायकवाड यांनी समजूत घातल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह स्वीकारला. या घटनेमुळे सीपीआरमध्ये काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, गर्दीमुळे रुग्णावर उपचार करण्यास विलंब झाला असल्यास ड्युटीवर असलेले डॉक्टर, वॉर्डबॉय यांची चौकशी करू, अशी माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
ऑक्सिजनही तातडीने लावण्यात आला. महिनाभर खासगी रुग्णालयात असतानाच अतिशय गंभीर असलेला हा रुग्ण सीपीआरमध्ये आणल्यानंतर दगावला. परंतु सीपीआरच्या यंत्रणेकडून कोणताही हलगर्जीपणा झालेला नाही. - डॉ. राजेंद्र मदने, वैद्यकीय अधीक्षक, सीपीआर