सामुदायिक विवाहातून सामाजिक बांधीलकीचा संदेश, ६२ वधू-वरांचा थाटात विवाह सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2018 06:04 PM2018-05-06T18:04:11+5:302018-05-06T18:04:11+5:30

सनई-चौघड्यांचा मंगलमय सूर..., पोलीस बॅँडची धून...,पावण्या-रावळ्यांची लगीनघाई...पुष्प पाकळ्यांच्या अक्षतांचा सुगंधी वर्षाव..., ना फटाक्यांचा आवाज.

Community Mandatory Message from Community Marriage, 62 Wedding Weddings | सामुदायिक विवाहातून सामाजिक बांधीलकीचा संदेश, ६२ वधू-वरांचा थाटात विवाह सोहळा

सामुदायिक विवाहातून सामाजिक बांधीलकीचा संदेश, ६२ वधू-वरांचा थाटात विवाह सोहळा

Next

कोल्हापूर : सनई-चौघड्यांचा मंगलमय सूर..., पोलीस बॅँडची धून...,पावण्या-रावळ्यांची लगीनघाई...पुष्प पाकळ्यांच्या अक्षतांचा सुगंधी वर्षाव..., ना फटाक्यांचा आवाज..., ना डॉल्बीचा दणदणाट..., अशा मंगलमय वातावरणात रविवारी कोल्हापुरातील पेटाळा मैदानावर पर्यावरणपूरक व सामाजिक बांधीलकी जोपासणारा सामुदायिक विवाह सोहळा झाला. श्रीखंड-पुरी भोजनाच्या पंगतीने हा सोहळा गोड झाला. या सोहळ्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुभाशीर्वाद देऊन वधू-वरांच्या नावे ४५०० रुपयांची कायम ठेव ठेवून त्यांना विमा कवच देण्यात येईल, अशी घोषणा केली.

धर्मादाय आयुक्त कार्यालय व सामुदायिक विवाह समिती कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सर्व जाती-धर्माच्या ६२ जोडप्यांचा सामुदायिक विवाह पालकमंत्री पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी आमदार अमल महाडिक, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, पोलीस अधीक्षक संजय मोहिते, राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे, धर्मादाय सहआयुक्त निवेदिता पवार, सहा. धर्मादाय आयुक्त राहुल चव्हाण,सामुदायिक विवाह सोहळा समितीचे अध्यक्ष राहुल चिकोडे आदी प्रमुख उपस्थित होते.

विवाह सोहळ्यासाठी भव्य मंडप, वधू-वरांसाठी स्वतंत्र प्लॅटफॉर्म उभारण्यात आले होते. सकाळी ११ वाजून ५४ मिनिटांच्या मुहूर्तावर विवाह सोहळा संपन्न झाला. अशा मंगलमय वातावरणात विविध धर्मातील रितीरिवाजाप्रमाणे विवाह झाला. यामध्ये हिंदू पद्धतीचे ४८, बौद्ध ११, मुस्लिम १, ख्रिश्चन १ आणि सत्यशोधक पद्धतीच्या एका विवाहाचा समावेश होता. सकाळी ९ वाजता वधू-वरांचे उत्साही वातावरणात स्वागत करून नाष्टा देण्यात आला. त्यानंतर ‘जागो हिंदुस्थानी’ हा बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. सकाळी वरांना समितीच्या वतीने संसारसेट देण्यात आला. 

या विवाह सोहळ्यातील वधू-वरांना प्रत्येकी ४५०० रुपयांची ठेव पावती देण्यात येणार असून या ठेवीच्या व्याजातून प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजनेचे विमा सुरक्षा कवच वधू-वरांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. ठेवीच्या व्याजातून वधू-वरांचे आयुष्यभराची वर्गर्णी आपोआप बँकेत जमा होईल आणि या दोन योजनांचा लाभ खºया अर्थाने वधू-वरांना होईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी महापालिका स्थायी समिती सभापती अशिष ढवळे, नगरसेवक विजय सूर्यवंशी, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, ‘रिपाइं’(ए)चे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, प्राचार्य अभयकुमार साळुंखे, नंदकुमार मराठे, अ‍ॅड. समृद्धी माने, सुप्रिया ताडे, विजयसिंह डोंगळे, राजू मेवेकरी अनंत खासबागदार, अजितसिंह काटकर, शिरीष खांडेकर, चारूदत्त जोशी, भारत खराटे, पारस ओसवाल, भरत ओसवाल आदी उपस्थित होते.

पालकमंत्र्यांकडून सोहळ्याचे कौतुक

 धर्मादाय आयुक्त कार्यालय आणि सामुदायिक विवाह सोहळा समितीने कोल्हापूरच्या मातीत सामुदायीक विवाह, सोहळ्याची संकल्पना रुजविण्याचा केलेला यशस्वी प्रयत्न कौतुकास्पद आहे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

अवास्तव खर्च वाचेल

अशा विवाह सोहळ्यांमुळे एैपत नसतानाही मुलीचे लग्न कर्ज काढून थाटामाठात करण्याच्या प्रथेला बगल मिळेल, तसेच लग्न समारंभासाठी होणारा अवास्तव खर्च वाचेल, यामुळे यापुढील काळात अशा प्रकारचे सामुदायीक विवाह सोहळे व्हावेत यासाठी या समितीच्या वतीने आवश्यक ती मदत केली जाईल, असा विश्वास पालकमत्र्यांनी व्यक्त केला.

संसार सटातून वधू-वरांना दोन महिन्याचे धान्य

संसार सटात वधू वरांना एक पिंप, ६ ताटे, ६ वाट्या, ६ चंमचे, ६ फुलपात्रे, २ तांबे, १ बाळकृष्ण, १ गादी, मणि मंगलसुत्र, नाकातील नतनी, जोडवी देण्यात आली. तसेच दोन महिने पुरेल इतका आटा, तांदुळ, साखर, तुरडाळ, चहा असे धान्य देण्यात आले. 

वधूवरांना आंब्याची रोपे भेट

लग्नानंतर वधु-वरांसह नातेवाईक अशा ५ हजार लोकांना श्रीखंड पुरीचे गोड भोजन देण्यात आले. त्याचबरोबर वधु-वरांना मुहुर्तमेढीसाठी अांब्याचे रोप देण्यात आले असून त्यांनी ते जोपासावे, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले.

 अवास्तव खर्च टळला

या सामुदायिक विवाह सोहळ्यामुळे आमचा अवास्तव खर्च टळला, तसेच आमच्या नव्या संसाराची सुरुवात एवढ्या मोठ्या सोहळ्यातून झाल्याचा आनंद आहे. याबद्दल संयोजकांचे आभारी आहे अशी प्रतिक्रीया नवदांपत्य प्रवीण व कोमल परमार यांनी व्यक्त केली.

Web Title: Community Mandatory Message from Community Marriage, 62 Wedding Weddings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.