Kolhapur: काळम्मावाडी धरण गळतीची समितीने केली पाहणी, अध्यक्ष टी. एन. मुंडे यांनी दिली महत्वाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 16:10 IST2024-12-24T16:08:56+5:302024-12-24T16:10:31+5:30
सोळांकुर : सिंचनावर कोणत्याही प्रकारचा परिणाम न होता काळम्मावाडी धरण गळती काम केले जाईल. गळतीमुळे धरणाला कोणत्याही प्रकारचा धोका ...

Kolhapur: काळम्मावाडी धरण गळतीची समितीने केली पाहणी, अध्यक्ष टी. एन. मुंडे यांनी दिली महत्वाची माहिती
सोळांकुर : सिंचनावर कोणत्याही प्रकारचा परिणाम न होता काळम्मावाडी धरण गळती काम केले जाईल. गळतीमुळे धरणाला कोणत्याही प्रकारचा धोका नाही. त्यामुळे लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रतिबंधक उपाययोजना गठीत समितीचे अध्यक्ष टी. एन. मुंडे यांनी केले. मुंडे यांच्यासह समितीच्या सदस्यांनी मंगळवारी काळम्मावाडी धरण क्षेत्र परिसराची पाहणी केला. यावेळी ते बोलत होते.
मुंडे म्हणाले, धरणातील पाणी नैसर्गिकरीत्या जितके खोलवर जाणार तितके हे काम लवकर होणार आहे. टप्प्याटप्प्याने होणाऱ्या कामामुळे हे काम दोन वर्षांमध्ये पूर्ण होईल. जानेवारी २०२५ दरम्यान धरणाच्या गळतीच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. कामासाठी आवश्यक असणारी यंत्रसामुग्री व मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. या कामासाठी ८० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे.
धरणाच्या मुख्य भिंतीला एकूण नऊ दगडी खांब असून यापैकी चार, पाच आणि सात नंबरच्या खांबामधून गळतीचे प्रमाण अधिक आहे. काळम्मावाडी धरण हे २५.४० टीएमसीला पूर्ण क्षमतेने भरले जाते; पण धरणाच्या सुरक्षेसाठी चालू वर्षी २२ टीएमसी पाणीसाठा करण्यात आला होता. तरीही यावेळी धरणाच्या भिंतीतून जवळपास ३७० लिटर प्रतिसेकंद गळती चालू आहे. आजस्थितीला धरणामध्ये २० टीएमसी पाणीसाठा आहे. काम सुरू असताना समितीकडून वेळोवेळी पाहणी करण्यात येईल.
यावेळी धरण गळती प्रतिबंधक उपाययोजना समितीचे सदस्य एच. व्ही. गुणाले, एस. एस. पगार, रिझवान अली, आर. एम. मोरे यांच्यासह कार्यकारी अभियंता अशोक पवार, स्मिता माने, अभियंता प्रशांत कांबळे, सहायक अभियंता विलास दावणे, प्रवीण पालकर, अधीक्षक अभियंता यांत्रिक जयवंत खाडे, कार्यकारी अभियंता बागेवाडी, अभियंता विजय राठोड, शाखा अभियंता नितीन भोजकर उपस्थित होते.