‘डिजिटल’चे धोरण ठरवण्यास समिती

By Admin | Updated: January 19, 2015 00:28 IST2015-01-19T00:16:10+5:302015-01-19T00:28:12+5:30

इचलकरंजी नगरपालिका : अनधिकृत होर्डिंग्ज, फलक जप्तीचे आदेश

Committee to decide 'Digital' policy | ‘डिजिटल’चे धोरण ठरवण्यास समिती

‘डिजिटल’चे धोरण ठरवण्यास समिती

इचलकरंजी : शहरात विविध अशा मोक्याच्या ठिकाणी उभारण्यात येणारे होर्डिंग्ज व डिजिटल फलक लावण्यासाठी धोरण ठरविण्याकरिता नागरिकांची एक समिती नेमण्याचा निर्णय नगरपालिकेत झालेल्या एका बैठकीत घेण्यात आला. पालिका सभागृहात झालेल्या बैठकीमध्ये शहरात असणारे अनधिकृत फलक ताबडतोब हलविण्याचा आणि ते जप्त करण्याचा आदेश मुख्याधिकारी सुनील पवार यांनी दिला.शहरामध्ये विविध ठिकाणी असलेल्या फलकांच्या जागेचा अनधिकृत वापर केला जात आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये सर्व व्यापक बैठकीत ठोस धोरण घेण्यासाठी पालिकेच्या सभागृहात ही बैठक घेण्यात आली. बैठकीसाठी नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे, उपनगराध्यक्ष रणजित जाधव, पाणीपुरवठा सभापती रवी रजपुते, आरोग्य समितीच्या सभापती सुजाता भोंगाळे, नगरसेविका बिस्मिल्ला मुजावर, रत्नप्रभा भागवत, हेमलता आरगे, पारूबाई चव्हाण, शकुंतला मुळीक, सुरेखा इंगवले, आक्काताई कोटगी, माधुरी चव्हाण, छाया पाटील, रेखा रजपुते, सामाजिक कार्यकर्ते दिलीप माणगावकर, अभिजीत पटवा, सुरेश गडगे, किरण माळी, माकपचे सदा मलाबादे, आदी उपस्थित होते.
शहरामध्ये असलेल्या होर्डिंग्ज आणि डिजिटल फलकांसाठी असलेल्या कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. होर्डिंग्ज व फलकांचा वापर व्यावसायिक जाहिरातींसाठी करण्यात यावा. शाळेच्या शंभर मीटर अंतरापर्यंत फलक लावण्यास मंजुरी नसावी. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींचे वाढदिवसाचे फलक लावण्यास मनाई करावी. महापुरूषांची छायाचित्रे असलेले फलक लावण्याची जबाबदारी संबंधित फलक लावणाऱ्यांची असावी, आदी प्रकारच्या सूचना या बैठकीत करण्यात आल्या.
यानंतर मुख्याधिकारी पवार म्हणाले, नगरपालिकेच्यावतीने लवकरच अनधिकृत फलकांची माहिती देण्यासाठी टोल फ्री नंबर सुरू करण्यात येणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार माहिती पुरविणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, तर सध्या शहरात असलेले अनधिकृत होर्डिंग्ज व फलक ताबडतोब काढून टाकले जातील आणि जप्त करण्यात येतील. (प्रतिनिधी)

फलकाने शाळेची इमारत झाकली
नगरपालिकेतील बैठकीत हा निर्णय चालू असतानाच शहरातील एका नामांकित शाळेसमोर ‘यशवंत’ समजणाऱ्या एका व्यक्तीचे मोठे चार डिजिटल फलक उभा करून शाळेची इमारतच झाकून टाकल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. विशेष म्हणजे याच शाळेच्या मैदानावर सदर व्यक्तीने (त्याच्या तथाकथित संस्थेने) एका कार्यक्रमाचे आयोजन केले असून, शाळेनेसुद्धा या कार्यक्रमास कोणत्या गुणवत्तेवर परवानगी दिली, याचीच चर्चा सुरू आहे.

Web Title: Committee to decide 'Digital' policy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.