नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिरातील गाभाऱ्याची स्वच्छता, आज सायंकाळपर्यंत मूळ मूर्तीचे दर्शन बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 13:55 IST2025-09-17T13:35:32+5:302025-09-17T13:55:06+5:30
भाविकांच्या सोयीसाठी देवीची उत्सवमूर्ती सरस्वती मंदिर येथे दर्शनासाठी ठेवण्यात येईल

नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिरातील गाभाऱ्याची स्वच्छता, आज सायंकाळपर्यंत मूळ मूर्तीचे दर्शन बंद
कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्याची आज बुधवारी स्वच्छता करण्यात येणार आहे. त्यामुळे देवीच्या मूळ मूर्तीचे दर्शन दिवसभर बंद राहील. भाविकांच्या सोयीसाठी देवीची उत्सवमूर्ती सरस्वती मंदिर येथे दर्शनासाठी ठेवण्यात येईल. सायंकाळी सात वाजता अभिषेक, सालंकृत पूजेनंतर दर्शन पूर्ववत सुरू होईल.
अंबाबाईच्या नवरात्रौत्सवाला पाच दिवस राहिले असून, आज बुधवारी देवीच्या मूळ गाभाऱ्याची स्वच्छता करण्यात येणार आहे. अंबाबाईचा सकाळी साडेआठचा अभिषेक केल्यानंतर देवीच्या मूळ मूर्तीला इरलं पांघरले जाईल. त्यानंतर दिवसभर गाभारा स्वच्छता होईल. यामध्ये श्रीपूजक, सफाई कर्मचारीदेखील सहभागी होतात. भाविकांना देवीचे दर्शन व्हावे यासाठी अंबाबाईची उत्सवमूर्ती सरस्वती मंदिर येथे दर्शनासाठी ठेवली जाईल. सायंकाळी साडेसहा वाजता देवीचा अभिषेक, सालंकृत पूजा व आरती झाल्यानंतर मूळ मूर्तीचे दर्शन सुरू होईल.
अग्निशमन यंत्रणेकडून कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
मंगळवारी दुपारी महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या वतीने अंबाबाई मंदिर परिसरात बंदोबस्ताला असलेले पोलिस, सुरक्षा रक्षक, देवस्थान समितीचे कर्मचारी व दुकानदारांना अग्निशमन यंत्रणा कशी हाताळावी याचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच, अचानक कुठे आग लागली किंवा दुर्घटना घडल्यास तातडीने काय खबरदारी व उपाययोजना कराव्यात याबाबत मार्गदर्शन केले.
सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन
नवरात्रौत्सवात रोज अंबाबाई मंदिर आवारात देवस्थान समितीतर्फे भजन, कीर्त, भावगीते, भक्तिगीते, भरतनाट्यम, कथम, गोंधळ यासह पारंपरिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते त्यासाठी समितीकडे मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले असून, पुढील दोन दिवसांत कार्यक्रमांचे वेळापत्रक ठरवले जाईल.