पोलिसांसमक्ष दगडफेक अन् जाळपोळ; फलकबाजीवरून कोल्हापुरातील सिद्धार्थनगरात राडा, आठ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 11:43 IST2025-08-23T11:42:32+5:302025-08-23T11:43:54+5:30

वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

Clashes in Siddharthnagar, Kolhapur over placards stone pelting and arson in front of police eight injured | पोलिसांसमक्ष दगडफेक अन् जाळपोळ; फलकबाजीवरून कोल्हापुरातील सिद्धार्थनगरात राडा, आठ जखमी

छाया-नसीर अत्तार

कोल्हापूर : सिद्धार्थनगर परिसरातील उद्यानासमोर मंडळाचा फलक लावण्यावरून तसेच साऊंड, लाईट्सचे स्ट्रक्चर उभे करण्यावरून निर्माण झालेल्या वादाचे पर्यावसन शुक्रवारी रात्री प्रचंड दगडफेकीत आणि वाहनांची तोडफोड करण्यात झाले. दोन गटातील या धुमश्चक्रीत काही जण जखमी झाले तर पाच ते सहा वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सुमारे तासभर दोन्ही बाजूने प्रचंड दगडफेक सुरू झाल्याने या परिसराला रणभूमीचे स्वरूप आले. पोलिस अधीक्षकांसह सर्व वरिष्ठ पोलिसांनी प्रचंड बंदोबस्तात ही धुमश्चक्री रोखली.

सीपीआर चौकाकडून सोन्या मारुती चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सिद्धार्थनगराच्या कोपऱ्यावर भारत तरुण मंडळ प्रणित राजेबागस्वार फुटबॉल क्लबचा फलक लावण्यात आला होता. या क्लबचा ३१ वा वर्षापन दिन असल्याने शुक्रवारी रात्री कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे सिद्धार्थनगर कमानीच्या पुढेच साऊंड तसेच लाईटसाठी स्ट्रक्चर उभे केले गेले होते.

परंतु एका गटाने त्यास हरकत घेतली. लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यास जाऊन पोलिस निरीक्षक श्रीराम कणेरकर यांच्याकडे तक्रार केली. त्यांना परवानगी दिली आहे का, अशी विचारणाही करण्यात आली. त्यानंतर कणेरकर यांनी घटनास्थळी जाऊन त्यांनी हे स्ट्रक्चर सक्तीने उतरविण्यास भाग पाडले.

त्यामुळे या वादावर पडदा पडला असाच समज झाला. परंतु स्ट्रक्चर उतरविल्यामुळे दुसरा गट संतप्त झाला होता. रात्री साडेआठ वाजता दुसऱ्या गटाचे लोक त्याठिकाणी जमण्यास सुरुवात झाली. काही जण इतके संतप्त झाले होते की, त्यांनी दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्या परिसरातील काही बल्ब फुटल्याने अंधार झाला. या संधीचा फायदा उठवित तक्रार करणाऱ्यांच्या दिशेने दगडफेक केली. त्यामुळे तक्रार करणारा गटही आक्रमक झाला. त्यांच्या बाजूनेही दगडफेक सुरू झाली. दोन्ही गट आमनेसामने येऊन जोरात दगडफेक करत होते. सुमारे ४५ ते ५० मिनिटे हा प्रकार सुरू होता.

सिद्धार्थ नगर परिसर व राजेबागस्वार परिसरातील दोन गटांमधील दगडफेकीसह जोरदार राडा इतका टोकाला गेला की, एका गटाने दगडफेकीसह सिद्धार्थनगराकडील वाहनांची तोडफोड व जाळपोळ करण्यास सुरुवात केली. लावण्यात आलेला फलक फाडण्यात आला. पोलिस यायला थोडा वेळ झाला. तोपर्यंत बराच राडा झाला होता.

राड्याची माहिती कळताच पोलिसांनी तात्काळ धाव घेतली. त्यांनी हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली. परंतु दोन्ही गट आक्रमक झाल्याने पोलिसांना ऐकत नव्हते. जसे पोलिस बंदोबस्त वाढत जाईल तसे दोन्ही गटांना शांत करण्यात पोलिस अधिकाऱ्यांनी यश मिळविले. पोलिस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, पोलिस अधीक्षक धीरज कुमार बच्चू, पोलिस उपाधीक्षक प्रिया पाटील, पोलिस उपाधीक्षक तानाजी सावंत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर, राजवाडा पोलिस निरीक्षक संजीव कुमार झाडे, शाहूपुरी पोलिस निरीक्षक संतोष डोके, शहर वाहतूक शाखेचे नंदकुमार मोरे, लक्ष्मीपुरी निरीक्षक श्रीराम कनेरकर यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. स्ट्रईकिंग फोर्सही मागविण्यात आला. त्यानंतर जमावावर नियंत्रण मिळविता आले.

सहा वाहनांचे मोठे नुकसान

सिद्धार्थनगर परिसरात पार्किंग केलेल्या सहा वाहनांची मोठी तोडफोड झाली आहे. एक वाहन पेटवून देण्यात आले. परंतु पोलिसांनी तात्काळ आग विझविली. काही दुचाकींचे नुकसान झाले आहे.

दगडांचा, काचांचा खच

सिद्धार्थनगर परिसरात रस्त्यावर दगडांचा खच, चपला पडल्याचे पहायला मिळाले. अंधार असल्याने कोण कोठून दगडफेक करत आहे हे कळत नव्हते. त्यामुळे या प्रकारामुळे प्रचंड दहशत निर्माण झाली होती.

महिला, मुलांचादेखील सहभाग

दोन्ही गटाकडून झालेल्या राड्यात महिला, लहान मुले, तरुण असे सर्वच जण सहभागी झाले होते. दोन्ही गटांना त्यांच्या त्यांच्या घरात घालविताना पोलिसांना मोठी कसरत करावी लागली.

Web Title: Clashes in Siddharthnagar, Kolhapur over placards stone pelting and arson in front of police eight injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.