पैशाचा वाद.. मद्यधुंद तृतीयपंथीयाने घातला धिंगाणा, अंगावर धावून येताच दाखविला पोलीसी खाक्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 12:54 IST2025-09-29T12:54:15+5:302025-09-29T12:54:38+5:30
केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल

पैशाचा वाद.. मद्यधुंद तृतीयपंथीयाने घातला धिंगाणा, अंगावर धावून येताच दाखविला पोलीसी खाक्या
कोल्हापूर : दाभोळकर कॉर्नर येथील खाद्यपदार्थ विक्रेत्याकडे जबरदस्तीने पैसे मागण्यापासून रोखल्यामुळे संतप्त झालेल्या तृतीयपंथीयाने शिवीगाळ करत थेट पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर धावून जात चप्पलेने मारहाण केली. रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास दाभोळकर कॉर्नर परिसरात ही घटना घडली. एवढी गंभीर घटना घडूनही पोलिसांनी केवळे अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याने नागरीकांच्यातून संताप व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दाभोळकर कॉर्नर पासून सासने ग्राउंडकडे जाणाऱ्या एका डोसा व्यावसायीकाकडे तीन तृतीयपंथी पैसे मागत होते. यावेळी त्या व्यावसायीकाने पैसे देण्यास नकार दिला. यामुळे तीन पैकी एका तृतीयपंथ्याने दुकानामध्ये गोंधळ घालून दुकानदार व त्याच्या पत्नीस शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तेथील नागरीकांनी या घटनेची माहिती शाहूपुरी पोलिसांना तसेच ११२ या हेल्पलाईन नंबरला दिली.
शाहूपुरी पोलीस ठाण्याचे एक पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तीनही तृतीयपंथ्यांना तेथून जाण्यासाठी विनंती केली. दोन तृतीयपंथी तेथून निघून गेले मात्र एका तृतीयपंथ्याने तेथील विक्रेत्यासोबत हुज्जत घालणे सुरुच ठेवले. यावेळी पोलीस कर्मचाऱ्याने त्या तृतीयपंथ्यास - हटकण्याचा प्रयत्न करत असताना त्या तृतीयपंथ्याने थेट पोलीस कर्मचाऱ्यास शिवीगाळ करत अंगावर धावून जाण्याचा प्रकार केला.
यानंतर त्या पोलीस कर्मचाऱ्याने त्या तृतीयपंथ्यास 'चांगलाच पोलीसी खाक्या दाखविला. मात्र त्या तृतीयपंथ्याने संबंधीत कर्मचाऱ्याच्या अंगावर धावून जात त्यांच्यावर चप्पल आणी दगडाने हल्ला चढविला. सुमारे १५ ते २० मिनीटे हा प्रकार सुरु होता. अन्य दोन तृतीयपंथ्यांनी त्या तृतीयपंथ्यास बाजूला नेल्यानंतरे या प्रकारावर पडदा पडला. मात्र एवढी मोठी गंभीर घटना घडूनही पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल केल्यामुळे नागरीकांच्यातून आश्चर्य व्यक्त होत आहे.