वीकेंडनंतर खरेदीसाठी नागरिकांची झुंबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:22 IST2021-04-13T04:22:34+5:302021-04-13T04:22:34+5:30

वीकेंडनंतर खरेदीसाठी नागरिकांची झुंबड : मास्कसह सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा रमेश साबळे । लोकमत न्यूज नेटवर्क कसबा तारळे : ...

Citizens rush to shop after the weekend | वीकेंडनंतर खरेदीसाठी नागरिकांची झुंबड

वीकेंडनंतर खरेदीसाठी नागरिकांची झुंबड

वीकेंडनंतर खरेदीसाठी नागरिकांची झुंबड : मास्कसह सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

रमेश साबळे ।

लोकमत न्यूज नेटवर्क

कसबा तारळे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने गेले दोन दिवस लागू केलेल्या वीकेंड लॉकडाऊननंतर आज तिसऱ्या दिवशी जीवनावश्यक वस्तू खरेदीच्या निमित्ताने नागरिकांनी रस्त्यावर उतरून अक्षरश: मास्क व सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडविला.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव अतिशय झपाट्याने वाढत आहे. परिणामी बाधित रुग्णांच्या संख्येतही दिवसागणिक होणारी वाढ प्रशासनाच्या दृष्टीने चिंताजनक बनली आहे.

अशा परिस्थितीत पूर्णतः लॉकडाऊन करणे सर्वसामान्य नागरिकांना परवडणार नाही. यासाठी यावर उपाय म्हणून आठवड्यातील फक्त दोन दिवस शनिवार, रविवार वीकेंड लॉकडाऊन करण्याचा शासनाने निर्णय घेतला असून, या दोन दिवसांत कडक निर्बंध लादण्यात येणार आहेत.

दरम्यान, शनिवार व रविवारच्या वीकेंड लॉकडाऊननंतर गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आणि जीवनावश्यक वस्तू खरेदीच्या नावाखाली आज राधानगरी तालुक्यातील अनेक गावांत नागरिक अक्षरशः रस्त्यावर उतरलेले होते. यातील बहुतांश लोकांच्या तसेच व्यापाऱ्यांच्याही तोंडावर मास्क तर नव्हते, तसेच सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडाल्याचे चित्रही दिसत होते. ग्रामपंचायत व कोरोना दक्षता समिती यांच्यासमोरच कोरोना रोखण्याची नियमावलीच नागरिकांनी पायदळी तुडवल्याचे विदारक दृश्य दिसत होते.

दिवसेंदिवस कोरोनाचे वाढणारे रुग्ण, प्रशासनाची होणारी धावपळ आणि नागरिकांचा बेफिकीरपणा यामुळे येणाऱ्या काळात ग्रामीण भागातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्यास नवल वाटू नये.

Web Title: Citizens rush to shop after the weekend