आधार अपडेटसाठी नागरिक झाले बेजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:57 IST2021-02-05T06:57:56+5:302021-02-05T06:57:56+5:30

कोल्हापूर : आधारकार्ड काढणे, त्रुटी दुरुस्त करणे ही कामे करताना अपुरी आधार केंद्र व तेथील गैरसोयींमुळे नागरिक बेजार ...

Citizens became bored for Aadhaar updates | आधार अपडेटसाठी नागरिक झाले बेजार

आधार अपडेटसाठी नागरिक झाले बेजार

कोल्हापूर : आधारकार्ड काढणे, त्रुटी दुरुस्त करणे ही कामे करताना अपुरी आधार केंद्र व तेथील गैरसोयींमुळे नागरिक बेजार झाले आहेत. या केंद्रांबाहेर नागरिकांच्या रांगा लागल्या असून, किमान चार ते पाच तास रांगेत ताटळकत उभे राहावे लागत आहे. बँका लोकांना इकडून-तिकडे हेलपाटे मारायला लावत आहेत.

आर्थिक वर्षअखेर जवळ आली की, आधार दुरुस्ती करण्यासाठी धावाधाव सुरु होते. यंदाही हीच परिस्थिती कायम आहे. जिल्हा प्रशासन, बॅंक आणि पोस्ट ऑफिसमधून आधारची कामे करुन दिली जात आहेत, पण सध्या पोस्ट ऑफिसमध्ये कर्मचारी बदल्या झाल्याची तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने तेथील सेवा खंडित आहे, त्याचा ताण बॅंकांमध्ये असलेल्या इतर केंद्रांवर पडत आहे. त्यामुळेच नागरिकांना ताटकळत राहावे लागत आहे.

सकाळी आठ वाजल्यापासून लोक बॅंकांसमोर रांगा लावत आहेत. अकरा वाजता केंद्रावरुन फॉर्म दिला जातो, तो भरुन पुन्हा रांगेत उभे राहावे लागते. रांग कितीही मोठी असली तरी एका दिवशी फक्त २० जणांचीच ‘आधार’ची कामे होतात. उर्वरित नागरिकांना परत जावे लागते. पुन्हा दुसऱ्या दिवशी रांगेत उभे राहायचे, नंबर नाही आला की परत जायचे, असा रोजचा हेलपाटा सुरु आहे. केंद्राच्या ठिकाणी नागरिकांना बसण्यासाठी सोय केलेली नाही, पाण्याचीही व्यवस्था नाही. त्यामुळे तसेच ताटकळत बसावे लागत आहे.

चौकट ०१

नवीन ७० केंद्रांना मंजुरी

आधार केंद्र कमी असल्याने लोकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी नवीन ७० केंद्र मंजूर झाली आहेत. परंतु, त्यासाठी केंद्र चालकांची निवड झालेली नाही. ती आठवडाभरात होणार आहे.

चौकट ०२

आधार काढण्यासाठी केंद्र संख्या

जिल्हा प्रशासन : ३३

केंद्र शासन : २१

बॅंका : ३०

पोस्ट ऑफिस : ४१

चौकट ०३

का करावे लागते नूतनीकरण

बालपणी आधार काढले आहे, आता चेहऱ्यात बदल आहे, म्हणून नवीन काढावे लागणे.

लग्नानंतर नाव, आडनावात बदल, पत्त्यात बदल

कार्डमध्ये नाव, गाव, यात व्याकरणाच्या चुका

आधारकार्ड चोरीला जाणे, हरवलेले असणे

जन्मतारीख पूर्ण फॉरमॅटमध्ये लिहिलेली नसल्याने शासकीय कामात अडचणी

चौकट ०४

आधारकार्ड सर्व योजनांशी व वैयक्तिक बॅंक खात्याशीदेखील संलग्न असल्याने ते अपडेट असणे गरजेचे आहे. हे नूतनीकरण व अपडेट करताना मूळ आधारकार्डची झेरॉक्स, मोबाईल नंबर आणि एखादे ओळखपत्र असणे आवश्यक आहे.

प्रतिक्रिया

माझे आधारकार्ड चाेरीला गेले, मला ते परत मिळावे यासाठी सर्व केंद्रांवर जात आहे. पण उद्या या, असे सांगून परत पाठवतात. काय कागद आणावेत, हेदेखील स्पष्ट सांगितले जात नाही.

- गंगूबाई वर्मा, शाहूपुरी, कोल्हापूर

प्रतिक्रिया

कितीवेळा कार्ड अपडेट करायचे हे शासनाने एकदाच काय ते सांगावे. विद्यार्थ्यांसाठी संबंधित शाळा, महाविद्यालयांमध्ये व्यवस्था करायला काय हरकत आहे. बराचवेळ रांगेत उभे राहून पायात गोळे येतात, ज्येष्ठ नागरिकांकडे कोणी लक्ष देणार आहे की नाही.

- सुरेश माळी, कसबा बावडा

फाेटो : ०३०२२०२१-कोल-आधार कार्ड ०१ व ०२

कोल्हापुरात आधारकार्ड अपडेट करण्यासाठी शहरातील बँकांच्या दारात सकाळपासूनच अशा रांगा लागत आहेत. (आदित्य वेल्हाळ)

(छाया: आदित्य वेल्हाळ)

Web Title: Citizens became bored for Aadhaar updates