कोल्हापूर जिल्ह्यात दोन दुर्देवी घटनांत दोन बालकांचा बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 17:05 IST2026-02-17T17:04:23+5:302026-02-17T17:05:50+5:30
म्हाकवे (जि. कोल्हापूर ) : बानगे (ता. कागल) येथील सोहम पृथ्वीराज पाटील (वय ५) याचा कणेरी (ता. करवीर) येथे ...

कोल्हापूर जिल्ह्यात दोन दुर्देवी घटनांत दोन बालकांचा बुडून मृत्यू
म्हाकवे (जि. कोल्हापूर) : बानगे (ता. कागल) येथील सोहम पृथ्वीराज पाटील (वय ५) याचा कणेरी (ता. करवीर) येथे खेळता खेळता घरासमोरील पाण्याच्या हौदात पडून मृत्यू झाला. सोमवारी सकाळी ही दुर्घटना घडली.
पृथ्वीराज पाटील हे पत्नी, सोहमसह कणेरी येथे नातेवाइकांकडे आले होते. सोहम खेळता खेळता घरासमोरील असणाऱ्या पाण्याच्या हौदात पडला. बराच वेळ तो घरात इकडे तिकडे न दिसल्याने सर्वांनी त्याचा शोध सुरू केला. यावेळी घरासमोरील हौदाचे झाकण अर्धवट उघडे असल्याचे दिसले. हौदामध्ये पाहिले असता सोहम दिसून आला. त्याला उपचारासाठी तत्काळ कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
पाण्याच्या टाकीत पडून पाच वर्षीय बालिकेचा मृत्यू
नेसरी : नेसरी-सांबरे मार्गावर नेसरी हद्दीत असलेल्या घरामागील पाण्याच्या टाकीत पडून ५ वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी (दि. १६) सकाळी घडली. चांदणी सुरेश खिटन (वय ५, रा. नेसरी ता. गडहिंग्लज) असे मृत बालिकेचे नाव आहे.
चांदणी ही सकाळी सुमारे सव्वा नऊच्या सुमारास घरात खेळत असताना घराच्या पाठीमागे असलेल्या पाण्याच्या टाकीत पडली. ही बाब लक्षात येताच तिला तातडीने ग्रामीण रुग्णालय नेसरी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.