विधानभवनात 'जनसुराज्य'चे कार्यालय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 18:17 IST2025-07-09T18:17:28+5:302025-07-09T18:17:38+5:30
फडणवीस यांच्याकडून विनय कोरेंच्या कार्याचे कौतुक

विधानभवनात 'जनसुराज्य'चे कार्यालय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई / वारणानगर : मुंबई येथे विधानभवनात जनसुराज्य शक्ती पक्षाच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सायंकाळी झाले.
जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विनय कोरे यांनी पक्ष कार्याची माहिती दिली. महायुतीमध्ये घटक पक्ष म्हणून काम करताना विधायक विकासाला पाठबळ देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे मोठे पाठबळ मिळत असल्याचा उल्लेख करून त्यांचे ऋण व्यक्त केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी विनय कोरे यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या. जनसुराज्य पक्षाचे आमदार डॉ. अशोकराव माने, प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी स्वागत केले. याप्रसंगी संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मंत्री अतुल सावे, खासदार धैर्यशील माने, काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील, आमदार विश्वजित कदम आदी उपस्थित होते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विजयसिंह माने यांनी आभार मानले.