Kolhapur: भोगावती साखर कारखान्याच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष बदलाच्या हालचालींना वेग
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 18:35 IST2025-06-10T18:34:18+5:302025-06-10T18:35:59+5:30
काँग्रेसचे धिरज डोंगळे यांना संधी शक्य, उपाध्यक्षपद 'शेकाप'कडे

Kolhapur: भोगावती साखर कारखान्याच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष बदलाच्या हालचालींना वेग
सुनिल चौगले
आमजाई व्हरवडे : परिते (ता.करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व उपाध्यक्ष बदलाच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत. येत्या आठ-दहा दिवसांत विद्यमान पदाधिकाऱ्यांचे राजीनामे होण्याची शक्यता असून त्यानंतर नवीन अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरु होणार आहे. अध्यक्षपदासाठी काँग्रेसचे धीरज डोंगळे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. उपाध्यक्षपदी शेतकरी कामगार पक्ष आग्रही आहे.
दीड वर्षापुर्वी कारखान्याच्या झालेल्या निवडणूकीत दिवंगत आमदार पी. एन. पाटील, जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक ए. वाय. पाटील, माजी आमदार संपतराव पवार आदींच्या नेतृत्वाखालील पॅनेलने सत्ता कायम राखली होती. पहिल्या वेळी काँग्रेसचे शिवाजीराव पाटील अध्यक्ष तर ए. वाय. पाटील यांचे समर्थक राजेंद्र कवडे यांना संधी मिळाली.
साधारणता वर्षाला दोन्ही बदल करुन बहुतांशी जणांना संधी देण्याचा आघाडीचा प्रयत्न आहे. त्यातून अध्यक्ष, उपाध्यक्ष बदलाच्या हालचाली सुरु आहेत. मागील वेळी कॉग्रेसने करवीरला अध्यक्षपद दिले, आता राधानगरी तालुक्याला मिळणार आहे. यामध्ये धीरज डोंगळे व ए. डी. चौगले (शिरगाव) यांची नावे चर्चेत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पाहता धीरज डोंगळे यांना सधी मिळण्याची दाट शक्यता आहे. उपाध्यक्ष पदासाठी शेतकरी कामगार पक्षाकडून केरबा पाटील व अक्षय पवार यांच्या पैकी एकाला संधी मिळू शकते.
भोगावतीची सत्ता आली तेव्हा अध्यक्षपदावर दावा केला होता पण आमदार पी.एन.पाटील यांनी समजूत काढून मला थांबविले होते. विधानसभा निवडणुकीनंतर हे पद देण्याचा शब्द दिला होता. त्यामुळे हे पद मलाच मिळेल. - धीरज डोंगळे, संचालक, भोगावती कारखाना
‘भोगावती’चे अध्यक्ष, उपाध्यक्ष बदलण्याबाबत आघाडीच्या पातळीवर अद्याप कोणतीच चर्चा झालेली नाही. - राहुल पाटील (नेते, सत्तारुढ आघाडी)
अध्यक्ष, उपाध्यक्ष बदलाची चर्चा खरी आहे. अध्यक्ष बदल करायचा की नाही हे सर्वस्वी काँग्रेस नेत्यांच्या भूमिकेवर अवलंबून आहे. पण शेकापला पहिल्यावेळी उपाध्यक्षपद मिळावे ही आमची मागणी होती. काही तांत्रिक अडचणीमुले ते मिळाले नाही. यावेळीही शेकापलाच उपाध्यक्षपद मिळेल. - केरबा पाटील, शेकापचे जेष्ठ नेते, संचालक