चंद्रकांत पाटील यांनीच शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, मंत्री सतेज पाटील यांचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 16:54 IST2022-03-23T16:48:11+5:302022-03-23T16:54:34+5:30
भाजपची पायाखालची वाळू घसरली. निवडणूक लढविण्याचा निर्णय चुकल्याचे चंद्रकांत पाटील यांच्या लक्षात आले आहे.

चंद्रकांत पाटील यांनीच शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, मंत्री सतेज पाटील यांचा पलटवार
कोल्हापूर : तीन वर्षापूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यामुळेच शिवसेनेच्या विद्यमान आमदारांचा पराभव झाला हे अख्ख्या जिल्ह्याने बघितले आहे, असा पलटवार पालकमंत्री सतेज पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर केला.
बंटी पाटील हा माणसं खाणारा माणूस असल्यामुळे शिवसैनिकांनी सावध रहावे अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर जहरी टीका केली होती. या टीकेला मंत्री पाटील यांनी प्रत्युत्तर देत भापजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. कोल्हापूर उत्तर मतदार संघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांचा उमेदवारी अर्ज भरण्यास जाण्यापूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते.
भाजपची पायाखालची वाळू घसरली आहे. निवडणूक लढविण्याचा निर्णय चुकल्याचे चंद्रकांत पाटील यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळेच ते माझ्यावर वैयक्तीक पातळीवर टिका करत आहेत. २०१९ च्या सुमारास भाजप आणि शिवसेना यांची युती होती. त्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यात शिवसेनेचे उमेदवार पाडण्यासाठी अपक्ष उमेदवार उभे केले. वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी प्रयत्न केले. शिवसेनेच्या पाठीत त्यांनी खंजीर खुपसला हे जिल्ह्याने बघितले आहे, असे पालकमंत्री पाटील म्हणाले.