चांदोली धरणात गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठा कमी, तरीही..; पाणीटंचाई भासणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2022 15:50 IST2022-06-01T15:39:32+5:302022-06-01T15:50:04+5:30
गतवर्षीच्या तुलनेत हा पाणी साठा थोड्या फार प्रमाणात कमी असला तरी हा पाणी साठा समाधानकारक असल्याचे धरण प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

चांदोली धरणात गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठा कमी, तरीही..; पाणीटंचाई भासणार?
अनिल पाटील
सरुड : चांदोली (वारणा) धरणात ३१ मे अखेर ३७. ७४ टक्के म्हणजेच ११. ६१ टीएमसी पाणी साठा शिल्लक आहे. गतवर्षीच्या तुलनेत हा पाणी साठा थोड्या फार प्रमाणात कमी असला तरी हा पाणीसाठा समाधानकारक असल्याचे धरण प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. गतवर्षी ३१ मे अखेर धरणात ४२ टक्के म्हणजेच १४. ४५ टीएमसी इतका पाणीसाठा होता.
चांदोली धरण परिसर हा पावसाचे आगार म्हणून ओळखला जातो. या परिसरात दरवर्षी सुमारे ३ हजार ते ५ हजार मिलिमीटर पावसाची नोंद होते. दरवर्षी १ जून पासुन चांदोली धरणाच्या तांत्रिक वर्षाला सुरुवात होते. १ जुन २०२१ ते ३१ मे २०२२ या तांत्रीक वर्षात चांदोली धरणात ३००४ मि.मि. इतक्या पावसाची नोंद झाली आहे. यावर्षीच्या तांत्रीक वर्षाच्या सुरुवातीला ११. ६१ टीएमसी इतका पाणीसाठा आहे. धरणातील पाणीसाठा समाधानकारक असल्याने यावर्षी वीजनिर्मिती केंद्रातून जून महिन्यातही वीज निर्मिती सुरु आहे.
तांत्रिक वर्षाच्या सुरवातीस धरणात असलेला सध्याचा पाणीसाठा हा समाधानकारक आहे. यावर्षी गंभीर पूर परिस्थिती निर्माण होणार नाही तसेच भविष्यात लाभ क्षेत्रात पाणीटंचाईही भासणार नाही या दृष्टीने धरण प्रशासनाच्यावतीने योग्य ते नियोजन सुरु आहे. - मिलिंद किटवाडकर, सहाय्यक अभियंता चांदोली धरण