अजितदादांना आव्हान, मृतांना अपघात विम्याचा लाभ द्याच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:24 AM2021-07-29T04:24:05+5:302021-07-29T04:24:05+5:30

विश्वास पाटील - लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : महापुरामध्ये मृत्यू पावलेल्या व जखमी झालेल्या लोकांना गोपीनाथ ...

Challenge Ajit Pawar, give the benefit of accident insurance to the deceased | अजितदादांना आव्हान, मृतांना अपघात विम्याचा लाभ द्याच

अजितदादांना आव्हान, मृतांना अपघात विम्याचा लाभ द्याच

googlenewsNext

विश्वास पाटील - लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : महापुरामध्ये मृत्यू पावलेल्या व जखमी झालेल्या लोकांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ मिळणे अवघड असल्याचे वास्तव आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी (दि. २७) कोल्हापुरात पत्रकार परिषदेत या मृतांना दोन लाख रुपयांची मदत या विमा योजनेतून देण्याची घोषणा केली आहे. या वर्षीच्या महापुरात राज्यात एकूण २०९ लोकांचा मृत्यू झाला. त्यांतील २१ लोक मुंबई-पुणे, ठाणे शहरांतील आहेत. ५२ लोक जखमी असून आठजण बेपत्ता आहेत. म्हणजे उपमुख्यमंत्री पवार यांनी मनावर घेतले आणि अपघात विमा योजनेचे निकष सौम्य केले तर २४८ लोकांना लाभ होऊ शकतो. मृत्यू पावलेली व्यक्ती पैसे देऊन परत येत नाही, हे खरे असले तरी कुटुंबीयांचा संकटातील भार थोडा नक्कीच हलका होऊ शकतो.

पवार यांनी घोषणा केल्यानंतर हा लाभ मिळणे कितपत शक्य आहे, याचा शोध ‘लोकमत’ने घेतला. सध्या राज्यात युनिव्हर्सल सोम्पो या कंपनीतर्फे ही विमा योजना राबविली जाते. ७ एप्रिल २०२१ ते ६ एप्रिल २०२२ असा या योजनेचा कालावधी आहे. १० ते ७५ वर्षांच्या व्यक्तीस अपघाती मृत्यू आल्यास किंवा दोन्ही अवयव गेल्यास प्रत्येकी दोन लाख व एका अवयवाचे अपंगत्व आल्यास एक लाख रुपये मिळतात. या योजनेचा लाभ मिळण्यात दोन मुख्य अडथळे आहेत. त्यांतील एक म्हणजे व्यक्ती मृत झाल्याचा पोलीस ठाण्यातील प्रथम खबर अहवाल (एफआरआय) बंधनकारक असतो. ज्या तारखेला ही योजना सुरू झाली, त्या तारखेला (म्हणजे ७ एप्रिल २०२१) संबंधित व्यक्ती शेतकरी हवी. म्हणजे त्या व्यक्तीचे नाव सातबारा जमीन मालकीपत्रकी नोंद असले पाहिजे. आतापर्यंतचे ५० टक्के प्रस्ताव या दोन अटींमध्येच अडकून नामंजूर होत असल्याचा अनुभव आहे. महापुरात मृत्यू झाला तरी त्याला मृत घोषित करण्याची प्रक्रिया फार क्लिष्ट आहे. आपल्याकडे कुटुंबातील प्रमुखाचे नावच जमीनमालक म्हणून नोंद असते. कुटुंबातील इतर त्या शेतीचे मालक असूनही सातबारा पत्रकी त्यांचे नाव नोंद नसल्याने योजनेचा लाभच मिळत नाही. त्यामुळे राज्य सरकार हे निकष कसे शिथिल करणार, त्यावरच योजनेचा लाभ पूरग्रस्तांना मिळणार का हे ठरणार आहे.

माझ्या पतीचा गतवर्षी २५ एप्रिलला विहिरीत बुडून मृत्यू झाला; परंतु ते मृत झाल्याचे येरवडा कारागृहाने अद्याप राजपत्र प्रसिद्ध न केल्याने मला अपघात विमा योजनेचा लाभ मिळालेला नाही. तो कधी मिळणार आहे?

आनंदी बळिराम नाळे (रा. सांगरूळ, ता. करवीर)

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचे २८ जुलै अखेरचे राज्यातील चित्र

वर्ष : २०१९-२०

एकूण प्रस्ताव सादर : ५७२३

प्रत्यक्ष लाभ मिळाला : ३०००

आता प्रकरणे सादर : १३००

मंजुरीच्या टप्प्यात : ५१०

प्रस्ताव नामंजूर : ९०३

(या वर्षी कोल्हापूर जिल्ह्यात ७ एप्रिलपासून फक्त १३ प्रस्ताव दाखल झाले आहेत.)

Web Title: Challenge Ajit Pawar, give the benefit of accident insurance to the deceased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.