Agricultural electricity issue:जिल्ह्यात 'स्वाभिमानी'चा चक्का जाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 16:19 IST2022-03-04T12:28:51+5:302022-03-04T16:19:39+5:30
आजपासून बारावीची परीक्षा सुरू होत असल्याने विद्यार्थांना त्रास न देता पेपर सुरू झाल्यावरच रस्ते अडवले जाणार

Agricultural electricity issue:जिल्ह्यात 'स्वाभिमानी'चा चक्का जाम
कोल्हापूर : शेतीला दिवसा वीज मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आज ग्रामीण भागात चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे. बारावीची परीक्षा सुरू होत असल्याने आंदोलनाला दुपारपासून सुरुवात झाली. यानंतर जिल्ह्यात अनेक ठिकाणी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या मारला आहे.
शेतीला दिवसा वीज मिळावी, या मागणीसाठी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा दिवसांपासून कोल्हापुरात महावितरणच्या दारात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. बुधवारी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी स्वतः शेट्टी यांच्याशी बोलून चर्चेचे निमंत्रण दिले. गुरुवारी राज्य विधिमंडळ अधिवेशनाचा पहिला दिवस असल्याने परिस्थिती पाहून दिवसभरात चर्चेला बोलावतो, असे सांगितले; पण दिवस मावळला तरी मंत्र्यांकडून निरोप आला नाही. त्यामुळे आंदोलनस्थळी शेतकरी पुन्हा आक्रमक झाले.
LIVE UPDATE -
मुदाळतिट्टा येथे शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या मारला आहे.
करवीर सांगरुळ फाटा कोपार्डे जवळ आंदोलन कार्यकर्ते रस्त्यावर
कोतोली फाटा चक्का जाम, प्रवाशांनी आंदोलनकर्त्यांशी घातली हुज्जत
राधानगरी येथेही करण्यात आला आहे रस्ता रोको