Kolhapur News: सीईओ, डीएचओ गेले साध्या वेशात, 'हसूर'चे डॉक्टर, कर्मचारी जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 12:05 IST2025-12-04T12:05:18+5:302025-12-04T12:05:56+5:30
दवाखान्यात कोणीच नव्हते उपस्थित, सर्वांना काढल्या नोटिसा, आरोग्य विभागात खळबळ

Kolhapur News: सीईओ, डीएचओ गेले साध्या वेशात, 'हसूर'चे डॉक्टर, कर्मचारी जाळ्यात
कोल्हापूर : सकाळची साडे नऊची वेळ. जिल्हा परिषदेचे सीईओ कार्तिकेयन यांनी साधा शर्ट आणि पांढरी पॅन्ट घातली. कुठेही ते अधिकारी वाटत नव्हते. तर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनी ट्रॅक सूट आणि टी शर्ट घातला. दोघांनीही तोंडाला मास्क लावला. त्यांनी गाडीही गावाच्या अलीकडे अर्धा किलोमीटरवर लावली आणि दोघांनीही करवीर तालुक्यातील हसूर प्राथमिक आराेग्य केंद्राचे ‘स्टिंग ऑपरेशन’ केले आणि या जाळ्यात डॉक्टर आणि सर्व कर्मचारी अडकले. दुपारनंतर हा प्रकार जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांमध्ये समजला आणि खळबळ उडाली.
कुठलीही आगावू कल्पना न देता कार्तिकेयन दवाखान्यात पोहोचले तर तिथे कोणीही उपस्थित नव्हते. साडेआठ वाजता ओपीडी सुरू करायची असताना डॉ. अश्विनी पाटील आल्याच नव्हत्या. केसपेपर करणारा शिपाई साडेदहा वाजता आला. मग कार्तिकेयन यांच्या साध्या वेशात असलेल्या अंगरक्षकाचा केसपेपर करण्यात आला. पावणे अकराला डॉ. पाटील आणि त्याआधी अन्य कर्मचारी आले आणि जिल्हा परिषदेच्या दवाखान्यांमध्ये नेमके काय चालते याचे प्रत्यंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आले.
गेल्या १५ दिवसांपासून दवाखान्यांना भेटी देण्याचे नियाेजन कार्तिकेयन यांच्याकडून सुरू होते. त्यानुसार सकाळी कोणालाही न सांगता हे दोघेच हसूरला पोहोचले.
पाहुण्यांकडे आलोय, सलाईन लावायचे आहे
तुम्ही कुठून आलाय असे या दोघांनाही तिथल्या रुग्णांनी विचारले. तेव्हा आम्ही कोल्हापूरहून पाहुण्यांकडे आलोय. सलाईन लावायचे आहे म्हणून दवाखान्यात आल्याचे या दोघांनी सांगितले. सुमारे तासभर हे दोघे अधिकारी दवाखान्यात असूनही येथील कोणालाही पुसटशी कल्पनाही नव्हती.
आणि डॉक्टर खुर्चीतूनच उठल्या
डॉ. अश्विनी पाटील उशिरा आल्या आणि नंतर त्यांनी रूग्ण तपासणी सुरू केली. परंतु त्यांच्या कामात कार्तिकेयन यांनी हस्तक्षेप केला नाही. त्यांची तपासणी होईपर्यंत त्यांनी इतर कर्मचाऱ्यांना एकत्र करत त्यांच्याकडून शिल्लक औषधे, बायोमेट्रिक हजेरी, विविध योजनांची अंमलबजावणी याची माहिती घ्यायला सुरुवात केली आणि या दोघांना पाहून कर्मचाऱ्यांंना झटकाच बसला. रूग्ण तपासून झाल्यानंतर मास्क काढलेल्या या दोघांनी डॉ. पाटील यांच्या दालनात प्रवेश केला आणि त्यांना झटकाच बसला. त्या खुर्चीतून उठूनच उभ्या राहिल्या.
रूग्णांशी साधला संवाद
डॉक्टर आणि कर्मचारी येईपर्यंत या दोन्ही अधिकाऱ्यांनी उपस्थित रुग्णांशी संवाद साधला. डॉक्टर वेळेत येतात का, औषधे मोफत मिळतात का, काेणी पैसे मागतात का, सलाईन लावले जाते का अशी विचारणा करत माहिती घेतली. यावेळी रुग्णांनी अनेक तक्रारी केल्या. नंतर कार्तिकेयन यांनी सर्वांची खरडपट्टी काढली.
सर्वांना नोटिसा
डॉक्टर आणि सहा कर्मचाऱ्यांना नोटिसा काढण्याचे काम बुधवारी संध्याकाळपर्यंत सुरू होते. या सर्वांना कारणे दाखवा नोटिसा काढण्यात आल्या असून त्यांचे म्हणणे घेण्याची औपचारिकता पूर्ण करून पुढील प्रशासकीय कारवाई करण्यात येणार आहे.