मध्य रेल्वेची सेवा सुरळीत; महालक्ष्मी एक्स्प्रेस वेळेतच!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 12:19 IST2025-05-27T12:19:24+5:302025-05-27T12:19:55+5:30
एसटी, खासगी ट्रॅव्हल्सची वाहतूकही सुरू

संग्रहित छाया
कोल्हापूर : मुंबईसह महाराष्ट्रभरात तुफान पाऊस सुरू आहे. दरम्यान, हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक रविवारी ४५ मिनिटे ठप्प झाली होती. मात्र कोल्हापूरकडे येणाऱ्या मार्गावरील महालक्ष्मी एक्स्प्रेस वेळेत पोहाेचल्याने ही सेवा सुरळीत असल्याची माहिती स्थानकप्रमुखांनी दिली. सोमवारी रात्री ही गाडी मुंबईकडे वेळेतच मार्गस्थ झाली. राज्य परिवहन महामंडळाच्या मुंबईकडे धावणाऱ्या सर्व गाड्यांची सेवाही सुरळीत असून, खासगी ट्रॅव्हल्सची वाहतूकही सुरू आहे.
पावसामुळे रविवारी वडाळा ते सीएसएमटी स्थानकावर ८ इंचापेक्षा अधिक पाणी साचल्यामुळे रेल्वेची वाहतूक ४५ मिनिटांसाठी बंद ठेवली होती. त्यामुळे प्रवासी स्थानकावर ताटकळले. महालक्ष्मी एक्स्प्रेसही बदलापूरजवळ काही काळ थांबवण्यात आली होती, मात्र त्यानंतर ही वाहतूक सुरू झाल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. सोमवारी सकाळी ही गाडी नियोजित वेळेत कोल्हापुरात पोहोचली.
सोमवारी रात्री कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराज टर्मिनसवरून महालक्ष्मी एक्स्प्रेस वेळेत सुटली. मार्गावर कुठेही पाणी आले नसल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले. राज्य परिवहन महामंडळाच्या मुंबईसह इतर जिल्ह्यांकडे धावणाऱ्या एसटी बसेसही वेळेत धावत असल्याची माहिती विभागीय आगाराकडून देण्यात आली. राज्यात कोठेही पावसामुळे वाहतूक ठप्प झाली नसल्याचा खुलासा त्यांनी केला. खासगी ट्रॅव्हल्सही सुरळीत सुरू असल्याचे ट्रॅव्हल्स चालक संघटनेने सांगितले.