पुरुषसुक्तातून जातीव्यवस्थेचे समर्थन
By Admin | Updated: July 13, 2014 00:47 IST2014-07-13T00:46:09+5:302014-07-13T00:47:14+5:30
बाबा आढाव यांचे मत : आंतरधर्मिय विवाहितांचा मेळावा

पुरुषसुक्तातून जातीव्यवस्थेचे समर्थन
कोल्हापूर : जातीला कोणताही वैज्ञानिक आधार नाही, मात्र गेली शतकानुशतके ही जात भारताच्या मानगुटीवर बसली आहे. पुरुषसुक्तसारख्या धार्मिक ग्रंथात अशा जातीव्यवस्थेचे बेमालुमपणे समर्थन केले जाते. दुसरीकडे शालेय शिक्षणात सर्वधर्मसमभाव शिकवला जातो पण धर्माची चिकित्सा कुणी करायची नाही, हा अलिखित नियम. अशा विसंगत परिस्थितीतून आणि जातींच्या बंधनातून बाहेर पडल्याशिवाय देशाचा विकास होणार नाही, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी व्यक्त केले.
आंतरजातीय आंतरधर्मिय विवाह सहायता केंद्राच्यावतीने शाहू स्मारक भवन येथे आयोजित आंतरधर्मिय विवाहितांच्या मेळाव्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. रमेश जाधव होते. व्यासपीठावर मेघा पानसरे, सीमा पाटील, कृष्णात कोरे, रमेश वडणगेकर उपस्थित होते.
आढाव म्हणाले, राज्यघटनेने सर्वांना आपल्या मनाप्रमाणे विवाह करण्याचे स्वातंत्र्य दिले असले तरी झुंडशाहीने ते दडपले जाते. आज आंतरधर्मिय विवाह जुळवण्याचा पुरोगामी संस्था पुरस्कृत करत असल्या तरी अशा विवाहांना एवढा विरोध का, हा खरा प्रश्न आहे. पदोपदी शिवाजी महाराज, शाहू महाराजांचा जयजयकार आणि त्यांच्या नावाने जातीचे राजकारण करणारी माणसं या महापुरुषांचा धर्मनिरपेक्षतावाद जाणीवपूर्वक लपवून ठेवतात. शाळेत धर्मनिरपेक्षता शिकवली जाते पण जातीव्यवस्थेची चिकित्सा करू दिली जात नाही.
रमेश जाधव म्हणाले, आंतरजातीय-आंतरधर्मिय विवाह हे जातीअंतासाठी उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे. शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या संस्थांनी हे कार्य सातत्याने सुरू ठेवले पाहिजे.
प्रास्ताविक मेघा पानसरे यांनी केले. यावेळी आरती पाटील, काशीनाथ सुतार, सेवानिवृत्त परिवहन अधिकारी पी. पी. मट्टेवार यांनी मनोगत व्यक्त केले. गोविंद पानसरे, उमा पानसरे, दिलीप पवार, रघुनाथ कांबळे, के. डी. खुर्द उपस्थित होते. सीमा पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. कृष्णात कोरे यांनी सूत्रसंचालन केले.