Kolhapur Circuit Bench: लढ्यास यश; आंदोलकांवरील खटले अजून सुरूच!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 13:58 IST2025-08-16T13:57:32+5:302025-08-16T13:58:53+5:30
खटले मागे घेण्याची मागणी, वकिलांसह सामाजिक कार्यकर्त्यांवर गुन्हे

Kolhapur Circuit Bench: लढ्यास यश; आंदोलकांवरील खटले अजून सुरूच!
कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात सुरू व्हावे या मागणीसाठी आंदोलने करणारे वकील, पक्षकार आणि काही सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांवर वेळोवेळी गुन्हे दाखल झाले. गेल्या १२ वर्षांपासून आंदोलक सुनावण्यांसाठी न्यायालयात खेटे मारत आहेत. आता सर्किट बेंचच्या मंजुरीमुळे शासनाने आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी केली जात आहे.
गेल्या ४२ वर्षांच्या खंडपीठ लढ्याला २००९ नंतर गती आली. वकिलांनी २०१२ मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून खंडपीठ मागणीचे निवेदन दिले. त्यावेळी पोलिसांशी झालेल्या बाचाबाचीमुळे तत्कालीन पोलिस निरीक्षकांनी वकिलांवर गुन्हा दाखल केला होता. याबाबत वकिलांनी तत्कालीन जिल्हा व सत्र न्यायाधीशांना भेटून अटक करण्याची मागणी केली. त्यानंतर न्यायाधीशांनी वकिलांकडून पत्र घेऊन पोलिसांना कारवाई न करण्याच्या सूचना दिल्या.
सप्टेंबर २०१५ मध्ये सहा जिल्ह्यातील वकिलांनी तीन दिवस लाक्षणिक कामबंद आंदोलन केले. त्यावेळी कोल्हापुरात ॲड. आर. एल. चव्हाण, अभिजित कापसे, प्रकाश मोरे यांच्यासह शंभराहून अधिक वकिलांवर गुन्हे दाखल झाले होते. सांगली, सातारा, म्हसवड, वाई येथेही वकिलांवर गुन्हे दाखल झाल्याने आंदोलन तापले होते.
वकिलांनी कामावर बहिष्कार टाकून केलेल्या आंदोलनाची मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली होती. त्यावेळी सहा जिल्ह्यांतील वकिलांना कन्टेम्प्ट ऑफ कोर्टच्या नोटिसा आल्या होत्या. त्यानंतर वकिलांनी उच्च न्यायालयात हजर राहून माफी मागितली. तसेच न्यायालयीन कामकाजावर परिणाम होणार नाही, याची खबरदारी घेण्याची ग्वाही दिली.
आत्मदहन आंदोलनाला १० वर्ष पूर्ण
थंडावलेले आंदोलन पुन्हा तीव्र करण्यासाठी १५ ऑगस्ट २०१५ मध्ये काही वकिलांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ॲड. विवेक घाटगे, कुलदीप कोरगावकर, पी. बी. दळवी, सरकारी वकील समीउल्ला पाटील, सिटिझन फोरमचे प्रसाद जाधव, समील पाच्छापुरे, उदय लाड आणि मनिषा नाईक यांनी जिल्हा न्यायालयाच्या आवारात घोषणाबाजी करीत आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना तातडीने ताब्यात घेऊन शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. हा खटला सध्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिका-यांसमोर सुरू आहे. ॲड. प्रकाश मोरे हे या खटल्यात आंदोलकांची बाजू मांडत आहेत.
सरकारी वकील पदावर असतानाही मी सामाजिक हितासाठी आत्मदहन आंदोलनात सहभाग घेतला होता. आता सर्किट बेंचला मंजुरी मिळाली. मागणी संपुष्टात आल्यामुळे आमच्यावरील गुन्हे मागे घ्यावेत. - ॲड. समीउल्ला पाटील - आंदोलक
आत्मदहन आंदोलनातील गुन्ह्याचा खटला मी लढवत आहे. आंदोलकांनी सामाजिक भावनेतून ते कृत्य केले होते. आता सरकारने पुढाकार घेऊन सर्वच आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत. - ॲड. प्रकाश मोरे - आंदोलकांचे वकील