चंदगड : ट्रक व एसटी बसची समोरासमोर झालेल्या भीषण धडकेत बसचालक जागीच ठार झाला. लक्ष्मण पांडुरंग हळदणकर (वय ४८, रा. चंदगड) असे मृत चालकाचे नाव आहे. तर, ट्रक चालकासह बसमधील वाहकासह सहाजण जखमी झाले. यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात आज, मंगळवारी दुपारी बेळगाव-वेंगुर्ले रस्त्यावर सुपे फाट्याजवळ झाला. अधिक माहिती अशी की, आज, मंगळवारी दुपारी चंदगड आगाराची (एमएच १४, बीटी १५४१) या क्रमांकाची बस बेळगावला जात असताना सुपे फाट्याजवळील एका वळणावर (केए २५, एबी ९७७५) या क्रमांकाच्या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने बसला जोराची धडक दिली. यामध्ये बसचालक जागीच ठार झाला. त्याच्या मागील सीटवर बसलेले पॅसेंजरंही जखमी झाले असून वाहक सुरेश मरणहोळकर (रा. घुल्लेवाडी) ट्रक चालक ही जखमी झाला आहे. जखमींना तात्काळ रुग्णवाहिकेतून चंदगड ग्रामीण रुग्णालय व बेळगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. बेळगाव-वेंगुर्ले रस्त्यावर अपघात मधोमधच झाल्याने दोन्ही वाहने एकमेकात अडकल्याने रस्ता ब्लॉक झाला होता. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिस उपनिरीक्षक अरुण ढोंबे, पोलिस हवालदार अमोल पाटील, नितीन पाटील यांनी जेसीबी, ट्रॅक्टरच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी खुला करून दिला. अपघाताची नोंद चंदगड पोलिसात झाली आहे. तपासणी नाक्यावरील कर्मचाऱ्यांचे तत्काळ मदतकार्य अपघाताची भीषणता ओळखून तपासणी नाक्यावरील कर्मचारी अमोल देसाई, राहूल जांबोटकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी शासकीय मदतीची वाट न बघता तत्काळ मदतकार्य राबवत जखमींना रुग्णवाहिकेत घालून उपचारासाठी पाठवले. त्यामुळे जखमींवर वेळेत उपचार सुरू झाले.
Kolhapur: ट्रक-एसटी बसची समोरासमोर भीषण धडक, बसचालक जागीच ठार; सहा जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 19:19 IST