टोप येथे महामार्गालगत घरफोडी; गुंगीचा स्प्रे मारून सव्वा तीन लाखांचा ऐवज लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 10:30 IST2025-12-19T10:28:24+5:302025-12-19T10:30:34+5:30
ही घटना उघडकीस आल्यानंतर पाटील व परिसरातील नागरिकांनी तातडीने शिरोली पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. याप्रकरणी वैभव बाळासो पाटील यांनी शिरोली पोलिस ठाण्यात चोरट्यांविरोधात फिर्याद दाखल केली आहे.

टोप येथे महामार्गालगत घरफोडी; गुंगीचा स्प्रे मारून सव्वा तीन लाखांचा ऐवज लंपास
शिरोली
कोल्हापूर जिल्ह्यातील टोप येथे महामार्गाच्या लगत असणाऱ्या एका घरात दरोडा टाकण्यात आला. हे घर वैभव बाळासो पाटील यांचे आहे. त्यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी धाडसी घरफोडी करत सव्वा तीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. चोरट्यांनी घरात झोपलेल्या व्यक्तींच्या तोंडावर गुंगीचा स्प्रे मारून ही चोरी केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना गुरुवारी रात्री १०.३० ते शुक्रवारी पहाटे सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळी श्वानपथक आणि ठसे तज्ञ पथक आले होते. पुणे -बंगळूर महामार्गावर टोप गावच्या पूर्वेला ग्रामपंचायत शेजारी वैभव बाळासो पाटील यांचे घर आहे. गुरुवारी रात्री पाटील यांची आई, भाऊ, आजी सर्व मंडळी झोपी गेले असता चोरट्यांनी घरासमोरील पाळीव कुत्र्यांला गुंगीचे औषध घातले, आणि घराचा कडीकोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. आणि घरात झोपलेल्या लोकांच्या तोंडावर ही गुंगीच्या औषधाचा स्प्रे मारुन घरातील तिजोरी उघडून तिजोरीतील दोन तोळे सोन्याचे दागीने, चांदीचे दागिने, तीन मोबाईल फोन, रोख ३० हजार रुपये असा ३ लाख २१ हजारांचा मुद्देमाल लंपास केला.
यावेळी पाटील यांच्या घराशेजारी असलेले नातेवाईक कृष्णात गायकवाड हे पहाटे ३.३० वाजता लघुशंकेसाठी उठले असता त्यांनी घराचा दरवाजा उघडला असल्याचे पाहिले आणि घरात गेलो आणि घरातील लोकांना उठवण्याचा प्रयत्न केला पण ते गुंगीत होते.
ही घटना उघडकीस आल्यानंतर पाटील व परिसरातील नागरिकांनी तातडीने शिरोली पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. याप्रकरणी वैभव बाळासो पाटील यांनी शिरोली पोलिस ठाण्यात चोरट्यांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी घटनास्थळी येऊन श्वानपथकाला पाचारण केले पण श्वानपथक तिथेच घुटमळले, पोलीसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू केले आहे.
महामार्गालगत व वस्तीच्या परिसरात अशा प्रकारची गुंगीचा स्प्रे वापरून करण्यात आलेली धाडसी घरफोडी ही गंभीर असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.