बांधकाम कामगारांची बोगस नोंदणी, ४५ लाखांचा गंडा; कोल्हापुरात २५ जणांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 15:39 IST2025-07-31T15:38:57+5:302025-07-31T15:39:40+5:30
याबाबत प्रथमच कोल्हापुरात गुन्हा दाखल झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली

संग्रहित छाया
कोल्हापूर : दिव्यांग असल्याची खोटी प्रमाणपत्रे आणि मृत्यूचे बनावट दाखले सादर करून बोगस बांधकाम कामगारांनी शासनाला ४४ लाख ७७ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत सांगलीतील सहायक कामगार आयुक्त रोहित विश्वनाथ गोरे (वय ३४, रा. विश्रामबाग, सांगली) यांनी मंगळवारी (दि. २९) रात्री कोल्हापुरातील शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
त्यानुसार पोलिसांनी २५ जणांवर गुन्हा दाखल केला. बोगस बांधकाम कामगारांच्या विरोधात राज्यात प्रथमच मोठी कारवाई होत असल्याने बनावटगिरी केलेले बांधकाम कामगार आणि एजंटांचे धाबे दणाणले आहेत. लाडकी बहीण योजनेतील बोगसगिरीसोबतच आता या क्षेत्रातील बनावटगिरी उघड झाली आहे.
कामगार खात्याकडून बांधकाम कामगारांसाठी विविध योजना राबविल्या जातात. त्याचा लाभ घेण्यासाठी काही कामगारांनी बनावटगिरी केल्याचे प्रकार तपासणीत समोर आले. सांगली येथील सहायक कामगार आयुक्त रोहित गोरे यांनी कोल्हापुरातील सहायक कामगार आयुक्त कार्यालयाकडून लाभ घेतलेल्या अर्जदारांची तपासणी केली.
या तपासणीत २० कामगारांनी खोटी दिव्यांग प्रमाणपत्रे सादर करून प्रत्येकी दोन लाखांचा लाभ घेतल्याचे स्पष्ट झाले तसेच दोन प्रकरणांमध्ये आधीच मृत्यू झालेल्या कामगारांची खोटी मृत्यू प्रमाणपत्रे सादर करून नातेवाईकांनी लाभ घेतल्याचे लक्षात आले. काही जणांनी बांधकाम कामगार असल्याची खोटी प्रमाणपत्रे सादर केली आहेत. याबाबत गोरे यांच्या फिर्यादीनुसार शाहूपुरी पोलिसांनी २५ जणांवर गुन्हा दाखल केला. त्यात दोन महिलांचाही समावेश आहे.
यांच्यावर गुन्हा दाखल
कागल तालुक्यातील अनिल पांडुरंग कळके (रा. माद्याळ), चारूदत्त जोशी (चौगुले गल्ली, कागल), दत्तात्रय सदाशिव मोरबाळे (मुरगूड), सुरेश नारायण भोई (चिमगाव), बाळासोा गणपती लोंढे (सोनगे), तानाजी भाऊ खंडागळे, अश्विनी आप्पासोा मेटकर, रणजित कृष्णात हसबे, महेश तुकाराम बंबरे, विवेक राजाराम अस्वले, सुभाष निवृत्ती वंदाकर (सर्व रा. मुरगूड),
बापूराव परशुराम मोहिते (हळदी), संजय दत्तात्रय आगाज (चिमगाव), विलास परशुराम मोहिते (हळदी), सुनील शांताराम भराडे (निढोरी), भुदरगड तालुक्यात शीतल अमोल नाईक (खानापूर), अक्षय चंद्रकांत मेंगाणे (निळपण), रमेश केरबा चव्हाण (गारगोटी) अतिश विलास दाभोळे (वाघापूर), अशोक खंडेराव घोडके (म्हसवे),
सुनीता राजाराम बावडेकर (बाजारवाडी, आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली), राजश्री शहाजी पवार (सातार्डे, ता. पन्हाळा), शुभम सुरेश तुरंबेकर (राधानगरी रोड, कोल्हापूर), सागर मधुकर वागरे (करंजफेण, ता. राधानगरी)
कारवाईने खळबळ
बांधकाम कामगार योजनांचा लाभ घेण्यात राज्यात सर्वत्रच अनियमितता आहे. याबाबत प्रथमच कोल्हापुरात गुन्हा दाखल झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. फसवणुकीची व्याप्ती वाढण्याची शक्यता असून, काही एजंटांचे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.