कोल्हापुरात शिवाजी पुलावरून नदीत उडी घेतलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला, इन्स्टावर लाइव्ह येऊन केले होते कृत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 12:28 IST2024-12-23T12:27:57+5:302024-12-23T12:28:31+5:30
नातेवाइकांनी फोडला हंबरडा

कोल्हापुरात शिवाजी पुलावरून नदीत उडी घेतलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला, इन्स्टावर लाइव्ह येऊन केले होते कृत्य
कोल्हापूर : फोन करून मित्रांना इन्स्टावर लाइव्ह येण्याचे सांगून शिवाजी पुलावरून पंचगंगेत उडी घेतलेला हर्षवर्धन विजय सुतार (वय २१, मूळ रा. वरणगे पाडळी, ता. करवीर, सध्या रा. राजोपाध्येनगर, कोल्हापूर) याचा मृतदेह रविवारी (दि. २२) सकाळी अकराच्या सुमारास सापडला. त्याने शनिवारी दुपारी पुलावरून उडी मारली होती. अग्निशमन दलाचे जवान आणि करवीर पोलिसांनी पाणबुड्यांच्या मदतीने मृतदेह शोधून बाहेर काढला.
हर्षवर्धन सुतार हा शहरातील एका महाविद्यालयात ‘बीबीए’चे शिक्षण घेत होता. आईचे निधन झाल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून तो राजोपाध्येनगर येथे मामाकडे राहत होता. शनिवारी दुपारी तो त्याच्या दुचाकीवरून शिवाजी पुलावर पोहोचला. कॉलेजमधील मित्र-मैत्रिणींना फोन करून त्याने इन्स्टावर लाइव्ह यायला सांगितले. त्यानंतर आत्महत्या करीत असल्याचे सांगत त्याने पुलावरून नदीत उडी घेतली होती.
हा प्रकार समजताच अग्निशमन दलाचे जवान आणि करवीर पोलिसांकडून हर्षवर्धनचा शोध सुरू होता. शनिवारी सायंकाळी अंधार पडल्यानंतर शोधमोहीम थांबवली होती. रविवारी सकाळी दहापासून पुन्हा शोधमोहीम सुरू केली. पाणबुड्यांच्या मदतीने शोध सुरू असताना सकाळी अकराच्या सुमारास पुलाजवळ नदीत मध्यभागी त्याचा मृतदेह सापडला. सीपीआरमध्ये उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली.
नातेवाइकांनी फोडला हंबरडा
हर्षवर्धनचे वडील, मामा, मामी, आजी यांच्यासह मित्र-मैत्रिणी रविवारी सकाळपासूनच शिवाजी पुलावर पोहोचले होते. त्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढताच नातेवाइकांनी हंबरडा फोडला. त्याच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही. कौटुंबिक वाद किंवा नैराश्यातून आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला.