कोल्हापुरात नेत्यांच्या स्वागताला शालेय मुलींच्या गळ्यात भाजपचा स्कार्प, व्हिडिओ व्हायरल
By उद्धव गोडसे | Updated: March 1, 2023 16:06 IST2023-03-01T15:51:18+5:302023-03-01T16:06:49+5:30
व्हिडिओ व्हायरल झाला आणि अनेकांनी भाजपच्या नेत्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली

कोल्हापुरात नेत्यांच्या स्वागताला शालेय मुलींच्या गळ्यात भाजपचा स्कार्प, व्हिडिओ व्हायरल
कोल्हापूर : नेते मंडळींचे दौरे म्हंटले की त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांची धांदल उडते. नेते आणि पक्षाबद्दल असलेला आदर व्यक्त करण्यासाठी कार्यकर्ते जिवाचे रान करतात. पण काही ठिकाणी अतिउत्साहाच्या भरात पक्ष आणि राजकारण याच्याशी काडीचाही संबंध नसलेल्या लोकांना वेठीस धरले जाते. असाच प्रकार चंदगड तालुक्यातील बसर्गे येथे घडला.
भाजपचे नागरी हवाई उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या दौ-यादरम्यान जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थिनींच्या गळ्यात भाजपचे स्कार्प घालून त्यांना मंत्र्यांच्या स्वागतासाठी उभे केले. विद्यार्थिनींना मंत्र्यांसोबत लेझिमचा फेर धरण्यासही भाग पाडले. नेमका हाच व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आणि अनेकांनी भाजपच्या नेत्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली.
भाजप शिक्षण संस्थांना राजकीय अड्डे बनवत आहे. देशाचे भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांच्या गळ्यात पक्षाचे पट्टे अडकवले आहेत. त्यामुळे हा प्रवास नेमका कोणत्या दिशेने सुरू आहे? संयोजक आणि संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांवर जिल्हा प्रशासन कारवाई करणार का? असाही सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियात भलताच व्हायरल झाला.