Local Body Election: भाजपच ठरलं; कोल्हापूर जिल्ह्यात 'स्वबळावर' अन् 'स्वतंत्र' कुठं लढणार.. जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 17:50 IST2025-11-14T17:49:36+5:302025-11-14T17:50:35+5:30
सर्व इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या, अर्ज भरण्यास आजपासून प्रारंभ

Local Body Election: भाजपच ठरलं; कोल्हापूर जिल्ह्यात 'स्वबळावर' अन् 'स्वतंत्र' कुठं लढणार.. जाणून घ्या
कोल्हापूर : जिल्ह्यातील १० नगर परिषदा आणि ३ नगरपंचायती निवडणुकांसाठी गुरुवारी येथील पक्ष कार्यालयात झालेल्या बैठकीत भाजप ६ ठिकाणी नगराध्यक्षपदाचा उमेदवार उभा करणार असल्याचा निर्णय झाला. आजरा नगरपंचायत आणि चंदगड, शिरोळ, हुपरी, कुरुंदवाड, पेठवडगाव या नगरपरिषदा स्वबळावर लढवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, आमदार राहुल आवाडे, आमदार अशोकराव माने यांच्यासह पॅनेलवरील पदाधिकाऱ्यांनी सर्व इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या.
जिल्ह्यातील काही नगर परिषदांबाबत भाजपची भूमिका स्पष्ट झाली नव्हती. याबाबत मंत्री चंद्रकांत पाटील आणि खासदार महाडिक यांनी सर्वांशी चर्चा करून आढावा घेतला. प्रत्येक नगर परिषदेतील प्रत्येक इच्छुकांसोबत दुपारी १ ते संध्याकाळी ६ वाजपेर्यंत ही मॅरेथॉन बैठक त्यांनी घेतली. प्रमुख पदाधिकारी तसेच माजी सदस्यांची स्वतंत्र बैठक घेतली. महायुती तसेच सहयोगी पक्षासोबत चर्चा सुरू आहे.
कागलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेससोबत भाजप युती करण्यात येणार आहे. गडहिंग्लजमध्ये जनसुराज्य आणि स्वाती कोरी यांच्या जनता दल बरोबर भाजप युती करणार आहे. पन्हाळा आणि मलकापूर या नगर परिषदांसाठी जनसुराज्य पक्षाबरोबर चर्चा सुरू आहे. अन्य नगरपरिषदा आणि नगर पंचायतींसाठी घटक पक्षांबरोबर जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. लवकरच त्यांच्याबाबतचाही निर्णय घेतला जाईल.
या बैठकीला माजी आमदार सुरेश हळवणकर, प्रकाश आवाडे, संजय घाटगे यांच्यासह जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, राजवर्धन निंबाळकर, राहुल चिकोडे, प्रदेश सचिव महेश जाधव यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
अर्ज भरण्यास आजपासून प्रारंभ
दिवसभर चाललेल्या मॅरेथॉन बैठकीनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांना नगर परिषद आणि नगर पंचायतीसाठी आज, शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सांगण्यात आले. भाजप नगराध्यक्षपदाचे उमेदवार १७ तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाहीर करणार आहेत.