"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 21:31 IST2025-07-14T21:26:14+5:302025-07-14T21:31:59+5:30

गडहिंग्लजमध्ये 'शक्तिपीठ महामार्ग' समर्थनार्थ भाजपाची पदयात्रा

BJP MLA shivaji patil slams raju shetty regarding shaktipeeth highway protest farmers issue | "दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला

"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला

गडहिंग्लज: खोटी आशा दाखवून,भावना भडकावून शेतकऱ्यांच्या जीवावर आंदोलने करणाऱ्या आणि कारखानदारांशी तोडपाणी करून स्वतःची घरे भरणाऱ्यांना सोडून शेतकरी आता वेगळ्या, चांगल्या प्रवाहात सामील झाले आहेत. तथाकथित नेत्यांचा शेतकऱ्यांविषयीचा कळवळा खोटा आहे, त्यांच्या गावातही त्यांना कुणी विचारत नाही. त्यामुळे 'दोन हाणा पण मला नेता म्हणा' असे म्हणायची वेळ त्यांच्यावर आली आहे, असा घणाघात आमदार शिवाजी पाटील यांनी नामोल्लेख टाळून माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर केला.

भाजपातर्फेशक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ आयोजित पदयात्रेत ते बोलत होते. चंदगड- गडहिंग्लज -आजरा तालुक्यातून हा मार्ग जावा,अशी मागणी प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.दरम्यान,शक्तिपीठ विरोधकांच्या निषेधाच्या घोषणांबाजीसह 'देवाभाऊ-शिवाभाऊ आगे बढो,हम तुम्हारे साथ है !'ही घोषणा लक्षवेधी ठरली.

पाटील म्हणाले,दिल्लीपासून काश्मीरपर्यंतचे पर्यटक शक्तिपीठावरून जाणार आहेत.त्यामुळे पर्यटन व औद्योगिक विकासाला मोठी संधी आहे. त्यातून युवक व महिलांना रोजगार मिळेल. उपराजधानी बेळगावप्रमाणे गडहिंग्लज विभागाचा विकास होणार आहे.मात्र,केवळ विरोधासाठीच त्याला विरोध केला जात आहे.

चंदगड विधानसभा मतदारसंघाचा विकासासाठी शक्तिपीठ महामार्ग होणे आवश्यक आहे. तशी मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असून त्याची दखल त्यांनी घेतली आहे.यासंदर्भात आपण शेतकऱ्यांशीही विचारविनिमय करणार आहोत.त्यामुळे त्याला नक्कीच यश येईल,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आमदार पाटील यांनी येथील महात्मा बसवेश्वर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पदयात्रेला सुरूवात केली.दसरा चौकातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करुन पदयात्रेची सांगता झाली. पदयात्रेत नेतेमंडळी, कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कुराडे यांचा पाठिंबा

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा.किसनराव कुराडे यांनीही प्रांतकचेरीसमोर उपस्थित राहुन आमदार पाटील यांच्या शक्तिपीठाच्या मागणीला पाठिंबा दिला.विकासासाठी रस्ते महत्त्वाचे आहेत.म्हणूनच आपण पाठिंबा दिला आहे,असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

७२ कार्यकर्ते, ३४ लोकांना अटक!

शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात गडहिंग्लजमध्ये आंदोलन करणाऱ्या आंदोलकांची संख्या केवळ ७२ होती, त्यापैकी ३४ लोकांना अटक झाली,अशी टीकाही आमदार पाटील यांनी केली.

Web Title: BJP MLA shivaji patil slams raju shetty regarding shaktipeeth highway protest farmers issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.