Local Body Election Results 2025: भाजपने निवडणुका हायजॅक केल्या, सतेज पाटील यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 13:26 IST2025-12-22T13:25:09+5:302025-12-22T13:26:50+5:30
दडपशाही, पैसे, निवडणूक आयोगाचा गैरवापर केल्याची टीका

Local Body Election Results 2025: भाजपने निवडणुका हायजॅक केल्या, सतेज पाटील यांचा आरोप
कोल्हापूर : पैसा, दडपशाही, निवडणूक आयोगाचा गैरवापर करून भाजपने राज्यातील नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका हायजॅक केल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी रविवारी केला. जिल्ह्यात काँग्रेसने १२० जागा लढवल्या. यापैकी ६६ जागांवर यश मिळवले, असेही त्यांनी सांगितले. नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
ते म्हणाले, मतदारांना कोंडून दडपशाही करणे, पैशाचा प्रचंड वापर करणे, सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून भाजपने नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका जिंकल्या आहेत. या निवडणुकीत निवडणूक आयोगाची भूमिका पहिल्यापासूनच संभ्रम निर्माण करणारी राहिली. ऐनवेळी प्रचाराची मुदत वाढवली. याची माहिती केवळ सत्ताधारी यांनाच होती. निवडणूक आयोग भाजपच्या हातात असल्यानेच त्यांना निवडणूक जिंकण्याचा आत्मविश्वास निकालापूर्वीच आला होता. म्हणून महापालिका निवडणुकीत आम्ही आयाेगाकडे कडक नियमावली करण्याची मागणी केली आहे.
राज्यात काँग्रेस तीन हजार जागा लढवल्या. प्राथमिक माहितीनुसार यापैकी एक हजार जागांवर यश मिळवले आहे. पन्नासपेक्षा अधिक काँग्रेसचे नगराध्यक्ष झाले. जिल्ह्यातही काँग्रेसने स्थानिक विकास आघाडीच्या माध्यमातून चांगली कामगिरी केली आहे. या निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री येऊन एकेका नगरपालिकेस एक हजार, २०० कोटींचा निधी देऊ, असे आश्वासन दिले होते. हे आश्वासन आता त्यांनी पूर्ण करावे. तिजोरीची चावी माझ्याकडे आहे, म्हणणाऱ्यांनी तिजोरी उघडावी आणि तिजोरीचा मालक मीच आहे, म्हणणाऱ्यांनी त्याला मान्यता द्यावी.
निवडणूक अर्ज भरताना व्हिडिओ करण्याच्या सूचना....
आमदार पाटील म्हणाले, महापालिका निवडणूक इंडिया आघाडी म्हणून लढविणार आहे. शरद पवार राष्ट्रवादी, उध्दवसेना यांच्याशी जागेसंबंधी दोन फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र जागा वाटप करताना प्रभागातील सर्व भागातील उमेदवारांना प्रतिनिधित्व मिळेल याचा विचार प्राधान्याने करण्यात येणार आहे. महापालिका निवडणुकीत आमच्या उमेदवारांचा अर्ज बाद करण्यासाठी अर्जात खाडाखोड करण्याची भीती आहे. निवडणूक यंत्रणेवर विश्वास नसल्याने महापालिका निवडणुकीचा अर्ज भरताना प्रत्येक उमेदवारांनी व्हिडिओ करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
विरोधक संपवण्यासाठी फोडाफोडी...
प्रज्ञा सातव यांनी काँग्रेस सोडल्याबद्दल विचारले असता पाटील म्हणाले, राजीव सातव हे गांधी परिवाराशी एकनिष्ठ होते. त्यांच्या निधनानंतर पत्नी प्रज्ञा सातव यांना पक्षाने आमदार केले होते. आमदारकीचा कालावधी शिल्लक आहे. तरीही भाजपला विराेधक नको, असे वाटत असल्याने फोडाफोडी केली. नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या अजित पवार गटाच्या नगरसेवकांनाही भाजप फोडून आपल्याकडे घेत आहे.
दोरी तुटली आहे; पण .....
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सतेज पाटील यांच्याशी असलेली मैत्रीचे दोर तुटले असे म्हटले होते, यावर आमदार पाटील म्हणाले, मी महाविकास आघाडीत आहे. ते महायुतीत आहेत. त्यामुळे मैत्रीचा दोर तुटला आहे; पण त्याला गाठही बांधता येते. प्रत्येक निवडणुकीत आघाडीचे समीकरण बदलत असतात.
भाजपमध्ये जाणार का? प्रश्नही विचारू नका...
भाजपमध्ये तुम्ही जाणार का ? असे पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर आमदार पाटील यांनी हा प्रश्नही मला विचारू नका. काही लोक जाणीवपूर्वक अशा अफवा पसरवतात. त्यामध्ये काहीही तथ्य नसते.
पहिल्यांदा असे झाले आहे...
पूर्वी महापौर पदाचे आरक्षण निवडणुकीपूर्वी जाहीर होत होते. यावेळी पहिल्यांदाच निवडणूक लागली तरी महापौर पदाचे आरक्षण जाहीर झालेले नाही. लोकशाहीला हे अभिप्रेत नाही, असेही आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.