Kolhapur: वेगाचा हव्यास; बारा लाखांच्या स्पोर्ट्स बाईकने एकुलत्या मुलाचा बळी, महागडा हेल्मेट कॅमेरा सांगणार मृत्यूचं कारण!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 13:14 IST2025-04-21T13:13:54+5:302025-04-21T13:14:52+5:30
वर्षभरापूर्वीच घेतली होती दुचाकी

Kolhapur: वेगाचा हव्यास; बारा लाखांच्या स्पोर्ट्स बाईकने एकुलत्या मुलाचा बळी, महागडा हेल्मेट कॅमेरा सांगणार मृत्यूचं कारण!
उद्धव गोडसे
कोल्हापूर : तब्बल १२ लाखांची दुचाकी आणि महागड्या कॅमेऱ्याने सज्ज असलेले सुमारे ७० हजार रुपयांचे हेल्मेट वापरूनही अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारा सिद्धेश विलास रेडेकर (वय २३, रा. माळी कॉलनी, टाकाळा) याचा आजरा-आंबोली मार्गावर माद्याळ फाट्याजवळ अपघातीमृत्यू झाला. वेगाचा हव्यास एका उमद्या तरुणाच्या जीवावर उठला. सिद्धेश हा वेगाने धावणाऱ्या तरुणाईचे प्रातिनिधिक उदाहरण आहे. लाखो रुपयांची वाहने आणि सुरक्षा साधनांपेक्षाही जीव अनमोल आहे हेच या अपघाताने दाखवून दिले.
रस्ते गुळगुळीत झाले, महागडी वाहने हातात आली आणि सुरक्षेची साधने मिळाली तरी त्याचा योग्य वापर करणेही तितकेच गरजेचे असते. वाहतूक नियमांचे पालन करून गतीवर नियंत्रण ठेवले तरी अनेक अपघात टाळता येतात; मात्र नेमके याकडेच दुर्लक्ष होते आणि अपघातांना निमंत्रण मिळते. आजरा-आंबोली मार्गावर माद्याळ फाट्याजवळ रविवारी सकाळी झालेल्या अपघाताला दुचाकीची भरधाव गती कारणीभूत असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
या अपघातात तरुण रायडर सिद्धेश रेडेकर याच्या १२ लाखांच्या दुचाकीचा चक्काचूर झाला. त्याच्या डोक्यावरील हेल्मेट फुटले, तर त्यावरील कॅमेरा तुटून पडला. हेल्मेट फुटून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेने त्याच्या मित्रांना आणि नातेवाईकांना धक्का बसला. त्याच्या पश्चात आई, वडील आणि दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.
वर्षभरापूर्वीच घेतली दुचाकी
आर्किटेक्ट इंजिनिअरिंगच्या अभ्यासातील प्रगतीमुळे वडिलांनी सिद्धेशला १० जानेवारी २०२४ रोजी दुचाकी घेऊन दिली होती. दुचाकी खरेदीचे व्हिडीओ त्याने सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले आहेत. दुचाकीचे वजन १८९ किलो असून, टायरची रूंदी सुमारे सहा इंच आहे. प्रतिलिटर पेट्रोलला १९ किलोमीटर धावणाऱ्या या दुचाकीची किंमत सुमारे १२ लाख रुपये आहे. गेल्या वर्षभरात त्याने कोल्हापूरसह कोकणात काही राईड केल्याचे त्याच्या मित्रांनी सांगितले. तो अधूनमधून राईडसाठी बाहेर पडत होता.
वडील नामांकित बांधकाम व्यावसायिक
सिद्धेश याचे वडील विलास राजाराम रेडेकर हे मूळचे करवीर तालुक्यातील नंदगावचे. त्यांनी काही वर्षे महापालिकेत अभियंता म्हणून काम केले. त्यानंतर स्वत:ची रेवंता इंजिनिअर्स अँड डेव्हलपर्स फर्म सुरू केली. ते शहरातील नामांकित बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांचाही मोठा मित्रपरिवार असल्याने अपघाताची माहिती मिळताच आमदार जयंत आसगावकर, सेवानिवृत्त उपअधीक्षक सतीश माने, महापालिकेचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्यासह अनेक बांधकाम व्यावसायिकांनी सीपीआरमध्ये गर्दी केली होती.
मित्रांना अश्रू अनावर
अपघाताची माहिती मिळताच सिद्धेशचे मित्र सीपीआरमध्ये पोहोचले. त्याचा मृतदेह पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले. त्याच्या सोबतचे मोबाइलमधील आणि सोशल मीडियातील फोटो काढून मित्रांनी आठवणींना उजाळा दिला.
नेमकी गती किती?
सिद्धेशच्या दुचाकीचा अपघात झाला तेव्हा दुचाकीची नेमकी गती किती होती याचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे; मात्र दोन्ही वाहनांचे झालेले नुकसान पाहता दुचाकी भरधाव वेगात असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. दुचाकी चालवताना हेल्मेटवरील कॅमेरा सुरू होता काय? सोशल मीडियातून प्रवासाचे लाईव्ह सुरू होते काय? याचाही शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.