Kolhapur: भरधाव ट्रकची दुचाकीस पाठीमागून जोराची धडक, दुचाकीस्वार जागीच ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 12:09 IST2023-12-08T11:58:25+5:302023-12-08T12:09:46+5:30
ट्रकने पंधरा ते वीस फुट फरपटत नेले

Kolhapur: भरधाव ट्रकची दुचाकीस पाठीमागून जोराची धडक, दुचाकीस्वार जागीच ठार
शिरोली : भरधाव मालवाहतूक ट्रकने दुचाकीस पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. सतिश पांडुरंग गावडे (वय ४७, रा. कोडोली ता. पन्हाळा) असे मृताचे नाव आहे. टोप-शिये फाटा येथे आज, शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास हा अपघात झाला.
घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, कोडोली येथील सतिश गावडे हे शिरोली एमआयडीसीमधील मंत्री मेटॅलिक कंपनीत कामाला होते. कोडोलीहुन दुचाकीने कामावर जाताना महामार्गावरील टोप येथील एका हॉटेलसमोर आले असता पुण्याहून बंगळूरच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव मालवाहतूक ट्रकने गावडे यांच्या दुचाकीस पाठीमागून जोराची धडक दिली. धडकेत गावडे हे ट्रकच्या चाकाखाली सापडले. ट्रकने पंधरा ते वीस फुट फरपटत नेल्याने ते जागीच ठार झाले.
अपघातानंतर काही काळ वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआर रुग्णालयात पाठवण्यात आला. या घटनेची नोंद शिरोली पोलिस ठाण्यात झाली आहे.