bidri sugar factory kolhapur | "बिद्री" सुरू करण्यासाठी कामगारांचा संचालक मंडळाला घेराव
"बिद्री" सुरू करण्यासाठी कामगारांचा संचालक मंडळाला घेराव

सरवडे - बिद्री साखर कारखाना ऊस दराबरोबर सर्व कारभारात राज्यात अव्वल असताना शिवाय, कोणाचीही देणी थकीत नसताना असा कारखाना शेतकऱ्यांच्या हितासाठी तात्काळ चालू होणे गरजेचे आहे. मात्र शेतकरी संघटनेच्या निर्णयाचा या कारखान्याला फटका सहन करावा लागणार आहे. कारखाना अपेक्षित दर देणार असतानाही अशा कारखान्याचे कामकाज बंद ठेवणे सभासद व ऊस उत्पादकांना अर्थिक संकटात टाकणारे ठरणार आहे. यासाठी हा कारखाना कोणत्याही परिस्थितीत सुरू केलाच पाहीजे, अन्यथा कार्यकारी संचालकांना घेवून कारखान्याचे कामकाज मंगळवारपासून आम्ही सुरू करू असा इशारा बिद्रीच्या कामगारांनी देत संचालक मंडळाला घेराव घातला आहे. कारखाना सुरू करण्याचे आश्वासन मिळेपर्यंत हा घेराव कायम ठेवून कामगारांनी "सुरू करा, सुरू करा बिद्री कारखाना सुरू करा" अशा घोषणाबाजीने कारखान्याचे सभागृह दणाणून सोडले. अध्यक्ष के. पी. पाटील यांनी कामगारांच्या भावना समजून घेतल्या. मात्र कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.

बाळासाहेब फराकटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी अतिवृष्टीमुळे ऊस पिकाच्या उत्पन्नात घट झाली असून रिकव्हरी व वजनातही मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या विभागात शंभर गुऱ्हाळे सुरू आहेत. तर कार्यक्षेत्रातील ऊस अन्य कारखान्यांना आमच्याच कारखान्याच्या गेटवरुन जात असल्याचे निदर्शनास येत आहे. या सर्वाचा परिणामही बिद्री कारखान्याच्या आर्थिक घडीवर होणार आहे. त्यामुळे शेतकरी संघटनेने चांगला चाललेल्या बिद्री साखर कारखाना बंद करण्याचा अट्टहास सोडावा. संचालक मंडळाने याचा गांभिर्याने विचार करावा अन्यथा कामगार स्वत: च्या जबाबदारीवर कारखाना सुरू केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत.  
 
ऊस वाहतूक संघटनेचे नेते वसंतराव शिंदे म्हणाले, बिद्रीने ऊस उत्पादकांबरोबर कंत्राटदार व कामगार यांची देणी भागवली आहेत. तर दिवाळीला सुमारे 8 कोटी मागील देणे कारखान्याने दिले आहे. तसेच सातत्याने एफआरपीपेक्षाही अधिक दर दिला आहे. असे असताना बिद्रीवरच आंदोलन करणे चुकीचे आहे. अन्य कारखाने सुरू आहेत. बिद्रीच्या बहुतांशी टोळ्या कारखाना कार्यक्षेत्रात येऊन अनेक दिवस झाले, मात्र हा कारखाना सुरू नसल्याने त्यांचे हाल होत आहेत. आणखीन काही दिवस ही परिस्थिती अशीच राहिली तर टोळ्या अन्य कारखान्यांकडे जाण्याची शक्यता आहे. याचा एकूण परिणाम कारखान्याच्या एकूण कारभारावर होवू शकतो. म्हणून कारखाना सुरू होणे गरजेचे आहे. यावेळी अमर पाटील, जगन्नाथ पुजारी, वसंत कोंडेकर, सुनिल पिराले अशोक पाटील आदी कामगारांनी आक्रमकपणे आपल्या व्यथा मांडल्या.  या सभागृहात अध्यक्ष के. पी. पाटील, उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे, संचालक गणपतराव फराकटे, धोंडीराम मगदूम, उमेश भोईटे, युवराज वारके, कार्यकारी संचालक आर. डी. देसाई यांच्यासह कामगार प्रतिनिधी उपस्थित होते. 

 

Web Title: bidri sugar factory kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.