साके : बाचणी (ता. कागल) ते वडकशिवाले (ता. करवीर) या गावांदरम्यानच्या दूधगंगा नदीवरील नवीन पुलाचा भूमिपूजन समारंभ आज, शुक्रवारी सकाळी १० वाजता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाला खासदार संजयदादा मंडलिक, आमदार ऋतुराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
पुलापासून बाचणी गाव व वडकशिवाले गाव अशा दोन्ही बाजूंच्या जोडरस्त्यासह पुलाच्या बांधकामासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. प्रत्येकी २० मीटरच्या पाच गाळ्यांसह एकूण १०० मीटर लांबीचा सुसज्ज पूल व जोडरस्त्यासाठी सुमारे १० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
येथील दूधगंगा नदीवरील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याच्या माध्यमातून कागल व करवीर हे दोन तालुके जोडले गेले होते. मात्र दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच दूधगंगा नदीच्या पाण्याखाली हा बंधारा जाऊन किमान महिनाभर तो पाण्याखाली राहायचा. त्यामुळे दोन्ही बाजूंच्या बाचणी, बेलवळे खुर्द, बेलवळे बुद्रुक, साके, व्हनाळी, खेबवडे यांसह वडकशिवाले, इस्पुर्ली, नंदगाव येथील संपर्क तुटल्याने नागरिकांना आठ ते दहा किलोमीटरचा फेरा पडत होता. त्यामुळे या ठिकाणी होणाऱ्या नवीन पुलाच्या माध्यमातून पावसाळ्यातील अडचण कायमची निकाली निघाली आहे.
बाचणी येथील दूधगंगा नदीघाट या ठिकाणी होणाऱ्या या कार्यक्रमास बाचणी व वडकशिवाले या दोन्ही पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सूर्यकांत पाटील, सरपंच इकबाल नायकवडी, उपसरपंच गणपती पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांनी केले आहे.