कोल्हापुरात बाप्पांच्या विसर्जनाला राजकीय झालर, फलकबाजीने दक्षिणचे राजकारण ढवळले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2023 19:52 IST2023-09-23T19:51:54+5:302023-09-23T19:52:25+5:30
अमर पाटील कळंबा: बुद्धीदाता, विघ्नविनाशक मंगलमूर्ती श्री गणेशाला शनिवारी कोल्हापूरकरांनी जडअंत:करणाने निरोप दिला. यातच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विसर्जन ...

कोल्हापुरात बाप्पांच्या विसर्जनाला राजकीय झालर, फलकबाजीने दक्षिणचे राजकारण ढवळले
अमर पाटील
कळंबा: बुद्धीदाता, विघ्नविनाशक मंगलमूर्ती श्री गणेशाला शनिवारी कोल्हापूरकरांनी जडअंत:करणाने निरोप दिला. यातच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विसर्जन मार्गावर उभारलेल्या कमानी अन् फलकबाजीमुळे कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील राजकीय वातावरण ढवळून निघाले.
शिवसेना शिंदे गटाचे, माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी दक्षिण विधानसभा मतदारसंघात उभारलेल्या कमानी आणि मोक्याच्या ठिकाणी केलेली महाकाय फ्लेक्सच्या जाहिरातबाजीने दक्षिणच्या पारंपरिक काँग्रेस-भाजपच्या पक्षीय राजकारणा आडून होणाऱ्या पाटील-महाडिक राजकारणात आता क्षीरसागर यांनी उडी घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या. घरगुती गौरीगणेश विसर्जनाचे औचित्य साधून इराणी खाणीलगत, कळंबा- गारगोटी रस्त्यावर व अन्य मोक्याच्या ठिकाणी स्वागत कमानीसह 'दक्षिण ना उत्तर : कोल्हापूरचे विकासपर्व दक्षिणोत्तर' अशा आशयाची मोठी फ्लेक्स उभारण्यात आली आहेत.
काही दिवसांपूर्वी खासदार धनंजय महाडिक यांनी भाजप शाखांचे उद्घाटन करताना दक्षिण विधानसभा मतदारसंघातुन २०२४ ला अमल महाडिकच भाजपचे उमेदवार असणार हे जाहीर केले. तर, आमदार सतेज पाटील यांनी काँग्रेस गटनेत्यांच्या वाढदिवसाच्या नागरी सत्कार सोहळ्यात आमदार ऋतुराज पाटील यांनी केलेल्या विकासकामांचा उल्लेख करत भाजपवर तोंडसुख घेतले होते. यातच दक्षिणच्या राजकारणात आता क्षीरसागर यांनी उडी घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील काका पुतण्याजोडीने लक्ष घातल्याने माजी आमदार राजेश क्षीरसागर अस्वस्थ झाले होते. राज्यातील महाविकास आघाडीच्या राजकारणाने आमदार सतेज पाटील माजी नगरसेवक रविकिरण इंगवले यांच्यातील कटुता कमी झाली. त्यामुळे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यपुढे नवीन समस्या वाढल्या. राजेश क्षीरसागर यांच्या दक्षिण विधानसभा मतदारसंघातील कोल्हापूरचे विकासपर्व दक्षिणोत्तर या फ्लेक्सबाजीने त्यांना नेमके काय साधायचे आहे याचे उत्तर येणारा काळच ठरवेल.