'तिरुपती'मध्ये कोल्हापूर भवन, प्रस्ताव देण्याचे नायडू यांचे आवाहन; अंबाबाईला अर्पण केलेल्या साडीची किंमत १ लाख ६६ हजार रुपये
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 16:14 IST2025-09-30T16:08:00+5:302025-09-30T16:14:28+5:30
आदिशक्ती अंबाबाईला दरवर्षी नवरात्र उत्सवात तिरुमला तिरुपती देवस्थानकडून मानाचे महावस्त्र साडी अर्पण केली जाते

'तिरुपती'मध्ये कोल्हापूर भवन, प्रस्ताव देण्याचे नायडू यांचे आवाहन; अंबाबाईला अर्पण केलेल्या साडीची किंमत १ लाख ६६ हजार रुपये
कोल्हापूर : तिरुमला तिरुपती देवस्थान येथे कोल्हापूर भवन उभारण्यासाठीचा प्रस्ताव महिनाभरात द्या, तिरुमला देवस्थान समितीच्या बैठकीत यावर चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन तिरुपती देवस्थानचे चेअरमन बी.आर. नायडू यांनी सोमवारी दिले. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने यापूर्वी दोन वेळा दिलेल्या प्रस्तावांची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्यानंतर त्यांनी ही ग्वाही दिली.
आदिशक्ती अंबाबाईच्या कृपाशीर्वादामुळे तिरुमला येथे भगवान विष्णू व पत्नी लक्ष्मी यांची भेट झाली. त्यानंतर येथे श्री बालाजी रुपात श्री विष्णूंचे अवतारकार्य झाले. त्यानिमित्त आदिशक्ती अंबाबाईला दरवर्षी नवरात्र उत्सवात तिरुमला तिरुपती देवस्थानकडून मानाचे महावस्त्र साडी अर्पण केली जाते. त्यासाठी चेअरमन बी.आर. नायडू यांच्यासह पदाधिकारी कोल्हापुरात आले होते. अंबाबाईला महावस्त्र अर्पण केल्यानंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे व सचिव शिवराज नाईकवाडे यांनी तिरुपती येथे कोल्हापूर भवन उभारण्यासाठी यापूर्वी दोन वेळा पाठवलेल्या प्रस्तावांची माहिती दिली.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने तिरुपती देवस्थानकडे कोल्हापूर भवन उभारण्यासाठी तिरुपती देवस्थानकडे १ एकर जागेची मागणी केली आहे. त्यासाठीचे प्रस्ताव २०२२ व सन २०२३ साली असे दोन वेळा पाठवले आहेत. मात्र अजून तिरुपती देवस्थानकडून सकारात्मक निर्णय आलेला नाही. यापूर्वी तिरुपती देवस्थानने देशभरातील प्रमुख मंदिर व मठांना त्यांचे भवन बांधण्यासाठी जागा दिली आहे.
तिरुपतीला जाऊन आल्यावर अंबाबाईचे दर्शन घेण्याची पद्धत आहे. त्यासाठी थेट रेल्वे सोडली जाते. एवढे अंबाबाईचे महत्त्व असताना तिथे कोल्हापूर भवन नाही, ही बाब तिरुपती देवस्थानच्या निदर्शनास आणून देण्यात आली. यावर देवस्थानचे चेअरमन बी.आर. नायडू यांनी महिनाभरात प्रस्ताव घेऊन या, देवस्थानच्या बैठकीत यावर चर्चा केली जाईल, असे सांगितले.
पिस्ता रंग, गुलाबी काठाची साडी
तिरूमला तिरूपती देवस्थानकडून करवीर निवासिनी श्री अंबाबाईला मानाची साडी अर्पण करण्यात आली. पिस्ता रंग व गुलाबी काठाच्या या साडीची किंमत १ लाख ६६ हजार १०० रुपये आहे. चेअरमन बी. आर. नायडू यांच्या हस्ते जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी साडी स्वीकारली.
यावेळी तिरुमला देवस्थानचे व्ही. प्रभाकर रेड्डी, आमदार व्ही प्रशांती रेड्डी, भानुप्रकाश रेड्डी, सौरभ व्होरा, डॉलर दिवाकर रेड्डी, व्ही, शांताराम, मोहन राव, के. रामाराव, खासदार श्रीकांत शिंदे, धैर्यशील माने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, देवस्थानचे सचिव शिवराज नाईकवाडे, व्यवस्थापक महादेव दिंडे, वेदांतिका माने उपस्थित होत्या.