उच्च शिक्षण सहसंचालकांचे लेखापरीक्षण करा, मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 13:13 IST2025-02-18T13:12:18+5:302025-02-18T13:13:17+5:30
कार्यालयाची घेतली झाडाझडत

उच्च शिक्षण सहसंचालकांचे लेखापरीक्षण करा, मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आदेश
कोल्हापूर : कोल्हापूर विभागीय उच्चशिक्षण सहसंचालक कार्यालयाचे मुंबई महालेखापाल यांच्याकडून तातडीने लेखापरीक्षण करून घ्या, अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षणमंत्रीचंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी उच्च शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या. मंत्री पाटील यांनी अचानक विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयास भेट देऊन पाहणी केली. यात शासन निर्देशानुसार ई-ऑफिस शंभर टक्के क्षमतेने सुरू नसल्याचे निदर्शनास आले.
उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने सध्या राज्यभरात ‘झीरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल ड्राइव्ह’ ही मोहीम राबविली जात असून, त्यानुसार मंत्री पाटील यांनी या कार्यालयास भेट दिली. सर्व कर्मचाऱ्यांचे वेतननिश्चिती, वैद्यकीय प्रतिपूर्ती, भविष्यनिर्वाह निधी, सेवानिवृत्ती प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी ई-ऑफिस प्रणाली पूर्ण क्षमतेने सुरू करून याचा अहवाल संचालनालय स्तरावरील सहसंचालक यांना देण्याचे निर्देश दिले.
विभागीय कार्यालयाने शासन धोरणाशी विसंगत निर्णय घेऊन काहीप्रकरणी लाभ दिल्याने न्यायालयीन प्रकरणे उद्भवली आहेत. नियमबाह्य प्रकरणांची तपासणी करण्याच्या प्रकरणांची सूचना देण्यात आली. संचालनालयाद्वारे विभागातील प्राचार्य, अध्यापक, विद्यापीठ अधिकारी कर्मचारी यांना पत्र पाठवून विभागीय कार्यालयाकडे सादर; परंतु प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा तपशील मागवून घ्या, प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्याबाबत संचालनालय स्तरावरील सहसंचालक यांनी व्यक्तिशः लक्ष देऊन कार्यवाही करा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
दप्तरदिरंगाई खपवून घेणार नाही
कोणत्याही परिस्थितीत कार्यालयाकडून संस्थाचालक, प्राचार्य, अध्यापक, अध्यापकेतर कर्मचाऱ्यांची अडवणूक होणार नाही. दप्तरदिरंगाई खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा मंत्री पाटील यांनी दिला. दैनंदिन टपाल रोज ई-ऑफिस प्रणालीत स्वीकारून निपटारा करण्याबरोबरच कामकाजात सुधारणा करण्याचे निर्देश मंत्री पाटील यांनी दिले
कर्मचाऱ्यांना दणका..
वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांना बदलीची भीती वाटत नाही. त्यामुळे विभागीय सहसंचालक स्तरावरील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या धोरणामध्ये आवश्यक बदल करण्याचे निर्देश मंत्री पाटील यांनी दिले.
उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी कार्यालयाचा आढावा घेतला. आम्ही आजपासून शंभर टक्के क्षमतेने ई-ऑफिस सुरू करत आहोत. निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती दिवशीच पेन्शन मंजूर पत्र देण्याचा प्रयत्न आहे. - डॉ. धनराज नाकाडे, विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण विभाग, कोल्हापूर