Kolhapur Crime: पूर्ववैमनस्यातून घरात घुसून बाळाला मारण्याचा प्रयत्न, महिलेचा केला विनयभंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 12:19 IST2023-03-03T12:17:38+5:302023-03-03T12:19:45+5:30
तुमचा वंश जिवंत ठेवत नाही, असे म्हणत गळा दाबण्याचा प्रयत्न

Kolhapur Crime: पूर्ववैमनस्यातून घरात घुसून बाळाला मारण्याचा प्रयत्न, महिलेचा केला विनयभंग
इचलकरंजी : कोरोची (ता.हातकणंगले) येथे पूर्ववैमनस्यातून तिघांनी एका घरात घुसून महिलेचा विनयभंग केला तसेच सव्वा महिन्याच्या बाळाचा गळा दाबण्याचा प्रयत्न करत दहशत माजवली. याप्रकरणी तिघांवर शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून दोघांना अटक केली आहे.
विकी अशोक माने (रा. राममंदिरजवळ, कोरोची) व ओंकार पांडुरंग रानभरे ( २३, रा. चव्हाणवाडी, कोरोची) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना येथील न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणातील तिसरा संशयित अनोळखी असून, पोलिस या दोघांच्या माध्यमातून त्याचा शोध घेत आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी, तक्रारदार महिलेचा पती आणि वरील तिघे संशयित यांच्यात पूर्वीचा वाद आहे. त्यावेळी पीडित महिलेच्या पतीने या संशयितांना मारहाण केली होती. त्याच्यावरही त्यावेळी गुन्हा दाखल झाला होता. तो सध्या जामिनावर बाहेर आला आहे. तो आल्याचे समजताच संशयितांनी कोयता घेऊन त्याच्या घरात घुसले. मात्र, तो घरात नव्हता. त्यामुळे संशयितांनी महिलेच्या हातातील सव्वा महिन्याच्या बाळाला हिसकावून घेतले.
तुमचा वंश जिवंत ठेवत नाही, असे म्हणत त्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी महिलेने प्रतिकार केला असता तिच्याशी झटापट करून अंगावरील वस्त्रे फाडून तिचा विनयभंग केला तसेच त्यावेळी सासू आणि नणंद यांनी मध्ये पडल्याने त्यांनाही धक्काबुक्की करत शिवीगाळ केल्याचे पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.