जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न; तिघांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2021 15:50 IST2021-01-27T15:49:41+5:302021-01-27T15:50:36+5:30
Crimenews kolhapur collector - पाचगाव (ता. करवीर) येथील घरासमोर वहिवाटीसाठी रस्ता मिळत नाही, या कारणात्सव यशवंत गणपती भालकर यांनी मंगळवारी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने त्यांना ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. त्यांच्यासह मारुती भालकर, उमाजी भालकर अशा तिघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी यशवंत भालकर यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यांना पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांनी ताब्यात घेतले.
कोल्हापूर : पाचगाव (ता. करवीर) येथील घरासमोर वहिवाटीसाठी रस्ता मिळत नाही, या कारणात्सव यशवंत गणपती भालकर यांनी मंगळवारी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने त्यांना ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. त्यांच्यासह मारुती भालकर, उमाजी भालकर अशा तिघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत माहिती अशी की, यशवंत भालकर यांनी आपल्या घरासमोर वहिवाटीसाठी रस्ता मिळावा, अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. मात्र वारंवार पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्याच्या कारणास्तव त्यांनी प्रजासत्ताकदिनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यामुळे येथे अग्निशमन दलाची गाडी, रुग्णवाहिका व पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
सकाळी सव्वानऊच्या सुमारास भालकर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आले व त्यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे उपस्थितांची धावपळ उडाली. पोलीस व अग्निशमन दलाच्या दस्तगीर मुल्ला, महेश पाटील, रज्जाक मुलाणी, रमेश जाधव, विशाल चौगुले, प्रतीक ठमके यांनी हा प्रकार रोखला. पुढील प्रतिबंधात्मक कारवाईसाठी त्यांना शाहूपुरी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. दुपारी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.