आजरा नगराध्यक्षपद खुले, बहुरंगी लढत; चराटी-शिंपी गटाची समझोता एक्स्प्रेस पुढे राहणार की सवतासुभा मांडणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 18:20 IST2025-10-07T18:20:08+5:302025-10-07T18:20:39+5:30
आजरा : आजरा नगराध्यक्षपद खुले झाल्याने यंदा मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. भाजपाकडून अशोक चराटी, जनार्दन टोपले, सुधीर कुंभार, ...

आजरा नगराध्यक्षपद खुले, बहुरंगी लढत; चराटी-शिंपी गटाची समझोता एक्स्प्रेस पुढे राहणार की सवतासुभा मांडणार
आजरा : आजरा नगराध्यक्षपद खुले झाल्याने यंदा मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. भाजपाकडून अशोक चराटी, जनार्दन टोपले, सुधीर कुंभार, महाविकास आघाडीकडून संभाजी पाटील व संजय सावंत, काँग्रेसकडून अभिषेक शिंपी, मुस्लीम समाजाकडून आलम नाईकवाडे, आबुताहेर तकीलदार, अन्याय निवारणकडून परशुराम बामणे हे इच्छुक आहेत. त्यामुळे नगरपंचायतीची निवडणूक बहुरंगी होणार आहे.
गेल्यावेळी नगरपंचायत स्थापनेनंतर प्रथमच इतर मागास प्रवर्ग महिलेसाठी नगराध्यक्षपद राखीव असताना तिरंगी लढत झाली होती. त्यावेळी चराटी यांच्या ताराराणी आघाडीला नगराध्यक्षासह ९ जागा, काँग्रेसला २, राष्ट्रवादीला ३, शिवसेना १, मंत्री प्रकाश आबिटकर व जनार्दन टोपले यांच्या तिसऱ्या आघाडीला १ तर अपक्ष १ अशा जागा मिळाल्या होत्या. नगरपंचायतीत सुरू झालेली चराटी-शिंपी गटाची समझोता एक्स्प्रेस पुढे राहणार की सवतासुभा मांडणार, याकडेही नागरिकांचे लक्ष आहे.
पक्षाऐवजी शहरातील गट-तट, संघटना एकत्र येण्यासाठी बैठका सुरू झाल्या आहेत. तर मुस्लीम समाजाचा नगराध्यक्ष करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरू आहेत. मंत्री प्रकाश आबिटकर हे चराटी यांच्यासोबत की स्वतंत्र भूमिका घेणार, मंत्री हसन मुश्रीफ व आमदार शिवाजी पाटील यांची ताकद कोणाच्या पाठीशी राहणार, यावर नगराध्यक्षपदाची निवडणूक दुरंगी की बहुरंगी होणार, हे स्पष्ट होणार आहे.