आचारसंहिता लागताच कोल्हापूर जिल्ह्यातील दोन हजार गुन्हेगार रडारवर, सोशल मीडियावर नजर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 17:49 IST2025-11-06T17:48:53+5:302025-11-06T17:49:18+5:30
विधानसभा निवडणुकीत ६७५ जणांवर कारवाई

आचारसंहिता लागताच कोल्हापूर जिल्ह्यातील दोन हजार गुन्हेगार रडारवर, सोशल मीडियावर नजर
कोल्हापूर : नगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता सुरू होताच पोलिसांकडून जिल्ह्यातील दोन हजार सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाया केल्या जात आहेत. स्थानिक पोलिस ठाण्यात परवानाधारक शस्त्रे जमा करण्याचा आदेश दिला आहे.
कायदा सुव्यवस्था राखणे आणि मतदान प्रक्रियेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांची सराईत गुन्हेगारांवर नजर आहे. गेल्या दहा वर्षांत निवडणुकांच्या अनुषंगाने दाखल झालेले गुन्हे आणि गुन्हेगारांची यादी पोलिसांनी काढली आहे. याशिवाय गेल्या दोन वर्षांत दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांवरही प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे.
दोन हजार सराईतांवर तात्पुरती हद्दपारी, चांगल्या वर्तनाचे प्रतिज्ञापत्र लिहून घेणे, समज देणे, स्थानिक पोलिस ठाण्यात नियमित हजेरी लावण्याच्या कारवाया केल्या जात आहेत. उपविभागीय कार्यालयांकडून पोलिस ठाणेनिहाय याचा आढावा घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीत ६७५ जणांवर कारवाई
विधानसभा निवडणुकीत १५ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर २०२४ या काळात पोलिसांनी निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात ६७५ जणांवर कारवाई केली होती. अटकेतील आरोपींकडून तस्करीतील दारू, गांजा, गुटखा असा दोन कोटी १७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता.
सोशल मीडियावर नजर
सोशल मीडियातून निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. यातून विविध राजकीय पक्षांसह धार्मिक, जातीय तेढ निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांची सोशल मीडियावर विशेष नजर आहे. सायबर सेलकडून काही संशयित खात्यांची नियमित पडताळणी केली जात आहे. कोणीही आक्षेपार्ह मजकूर व्हायरल करू नये, असे आवाहन पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी केले आहे.
शस्त्रे जमा करा
जिल्ह्यात साडेपाच हजार परवानाधारक शस्त्रे आहेत. निवडणूक काळात यांचा गैरवापर होऊ नये यासाठी सर्व शस्त्रे स्थानिक पोलिस ठाण्यात जमा करण्याचे आदेश दिले आहेत. सुरक्षा रक्षक, खेळाडू आणि शासकीय कर्मचारी वगळता इतरांची शस्त्रे जमा केली जाणार आहेत.
याबाबत विशेष खबरदारी
गांजा, चरस, दारू अशा अमली पदार्थांची बेकायदेशीर वाहतूक, विक्री रोखणे. हातभट्टीच्या दारू अड्ड्यांवर कारवाई करणे. मटका आणि जुगार अड्डे बंद करणे. यासह बेहिशेबी पैसे आणि मतदारांना आमिष दाखविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंची वाहतूक रोखण्यास प्राधान्य दिले जाईल, अशी माहिती पोलिस अधीक्षकांनी दिली.