Kolhapur: तब्बल ३२ घरफोडीचे गुन्हे उघडकीस; ६१ तोळे सोने, ४ किलो चांदीच्या दागिन्यांसह ६७ लाखांचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 12:00 IST2025-04-26T12:00:41+5:302025-04-26T12:00:57+5:30
कर्नाटक, कोकणसह जिल्ह्यात धुमाकूळ, दोन सख्ख्या भावासह, सावत्र भावाचा समावेश

Kolhapur: तब्बल ३२ घरफोडीचे गुन्हे उघडकीस; ६१ तोळे सोने, ४ किलो चांदीच्या दागिन्यांसह ६७ लाखांचा मुद्देमाल जप्त
कोल्हापूर : शहरासह कर्नाटक, कोकण आणि कोल्हापूर जिल्ह्यात २०२२ पासून घरफोडी करून धुमाकूळ घालणाऱ्या तिघा अट्टल चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून तब्बल ३२ घरफोड्या, एक दुचाकी चोरी उघडकीस आली. त्यांच्याकडून ६७ लाख रुपयांचे ६१ तोळे सोने, ४ किलो ७८७ ग्रँम चांदीचे दागिने, एक दुचाकी, कटावणी, हातमोजे, मार्तुल, असा मुद्देमाल जप्त केली. ही माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
सलीम महंमद शेख (वय ३७, रा.गंधारपाले, साहिलनगर, ता.महाड, जि.रायगड), जावेद महंमद शेख (वय ३०, रा.गंधारपाले, साहिलनगर, ता.महाड, जि.रायगड) या दोघा सख्ख्या भावांसह सावत्र भाऊ तौफिक महंमद शेख (वय ३०, रा.रुमाले मळा, आर.के.नगर, कोल्हापूर, मूळ रा.संजय गांधीनगर ता.चिक्कोडी, जि.बेळगांव) अशी त्यांची नावे आहेत. सराईत चोरटे रात्रीच्या वेळी घरफोडी करत असल्याचे उघडकीस आले आहे. त्यांना न्यायालयाने १३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. प्रभारी पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ.बी. धीरजकुमार उपस्थित होते.
जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांपासून रात्रीच्या वेळी घरफोड्या घडल्याच्या प्रकारांमध्ये वाढ झालेली होती. घरफोड्या झालेल्या परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज पोलिसांनी तपासले, त्यावेळी महाड येथील सराईत गुन्हेगार सलीम शेख याने केल्याची माहिती समोर आली. या प्रकरणी जिल्हा पोलिस प्रमुखांनी दिलेल्या आदेशानुसार स्वतंत्र पथके तैनात केली होती. या पथकांनी त्याचा शोध घेतला असता, तो बेळगांव येथे वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी बेळगांव येथे त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, पाच दिवस वेशांतर करून स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक बेळगांव येथे ठाण मांडून बसले होते. मात्र, तो सापडला नाही.
याच दरम्यान, सलीम शेख हा महाड येथे गेल्याची माहिती मिळाल्यानंतर महाडकडून पुन्हा दुचाकीवरून तो बेळगांवला येणार असल्याचे समजले. ११ एप्रिलला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने आंबा (ता.शाहूवाडी) येथे सापळा रचून सलीमसह तिघा साथीदारांसह ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता, त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर, गांधीनगर, जुना राजवाडा, लक्ष्मीपुरी, शाहुपुरी, राजारामपुरी, कागल येथे ३२ घरफोड्यांची कबुली दिली. दाखल असलेल्या गुन्ह्यात कोल्हापूर, सांगली, सातारा येथील आणखी घरफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
पथकात यांचा समावेश
पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शेष मोरे, विजय इंगळे, संजय कुंभार, संदीप बेंद्रे, शुभम संकपाळ, विशाल चौगुले, प्रवीण पाटील, अमित सर्जे, अरविंद पाटील, सागर चौगले, अमोल कोळेकर, सुरेश पाटील, कृष्णात पिंगळे, सुशील पाटील, राजेंद्र वरंडेकर, राजेश राठोड, रोहित मदनी, यशवंत कुंभार, नामदेव वादव, सायली कुलकर्णी, प्रज्ञा पाटील यांच्या पथकाने कारवाई केली.
जिल्ह्यात घरफोडीचा धुमाकूळ
वर्ष / उघडकीस आलेले गुन्हे
२०२२/७
२०२३/११
२०२४ /१०
२०२५ / ४
एकूण /३२
पोलिस ठाणे/ उघड गुन्हे
करवीर / १८
गांधीनगर / २
जुना राजवाडा / ५
लक्ष्मीपुरी / २
शाहुपुरी / २
राजारामपुरी / २
कागल / ९
इचलकरंजी / १ दुचाकी चोरीचा गुन्हा
एकूण / ३३ गुन्हे
सलीम शेख सराईत गुन्हेगार
सलीम शेख हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर खेड, दापोली, रोहा, माणगांव, पोलादपूर, गोरेगांव या ठिकाणी १२ घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. २०२१ साली तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर त्याने पुन्हा घरफोड्या करण्यास सुरुवात केली. त्याच्याकडून कोल्हापूर, सांगली, सातारा येथील अजून घरफोड्या उघडकीस येण्याची शक्यता आहे.