महिला, मुलींसह प्रौढांनी घर सोडून जाण्याचे प्रमाण वाढले; कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल २३८४ जण बेपत्ता
By उद्धव गोडसे | Updated: November 10, 2025 20:06 IST2025-11-10T20:05:46+5:302025-11-10T20:06:59+5:30
किती जणांचा लागला शोध.. जाणून घ्या

महिला, मुलींसह प्रौढांनी घर सोडून जाण्याचे प्रमाण वाढले; कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल २३८४ जण बेपत्ता
उद्धव गोडसे
कोल्हापूर : विविध कारणांनी महिला, मुलींसह प्रौढांनी घर सोडून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या १० महिन्यांत जिल्ह्यात तब्बल २३८४ जण बेपत्ता झाल्याच्या नोंदी पोलिस ठाण्यांमध्ये झाल्या. यातील १८४२ जणांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले, तर अजूनही ५४२ जणांचा शोध सुरूच आहे. विशेष म्हणजे यात १७ अल्पवयीन मुली आणि २८६ महिलांचाही समावेश आहे.
कौटुंबिक वाद, नैराश्य, अपयश, बेरोजगारी, लग्नाचे आमिष अशा अनेक कारणांनी शेकडो लोक घर सोडून निघून जात आहेत. काही ठराविक वेळेत ते परत न आल्यास नातेवाइकांकडून पोलिस ठाण्यात बेपत्ता वर्दी दिली जाते. त्यानुसार जिल्ह्यात गेल्या १० महिन्यांत तब्बल २३८४ जण बेपत्ता झाल्याच्या नोंदी आहेत. यात १४१९ महिला, ७१३ पुरुष, २०९ अल्पवयीन मुली आणि ४३ अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. यातील ११३३ महिला, ४७६ पुरुष, १९२ अल्पवयीन मुली आणि ४१ अल्पवयीन मुलांचा शोध घेऊन पोलिसांनी त्यांच्या घरी सोडले.
कौटुंबिक वादातील रागाच्या भरात निघून गेलेले काही लोक स्वत:हून परत येतात. लग्न आणि प्रेमाच्या आमिषाने घर सोडून पळालेल्या अल्पवयीन मुलींना काही दिवसांतच जगण्यातील वस्तुस्थितीचे चटके लक्षात येतात. अशा काही मुली दोन-तीन महिन्यांत घरी परततात. १८ वर्षांवरील तरुणी प्रियकरासोबत लग्न करून थेट पोलिस ठाण्यातच हजर होतात. त्यामुळे त्यांचा तपास थांबतो. तरीही २८६ महिला, २३७ पुरुष, १७ अल्पवयीन मुली आणि दोन मुलांचा शोध सुरूच आहे.
तर अपहरणाचा गुन्हा
अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्यास अपहरणाचा गुन्हा नोंद केला जातो. पोलिसांसह अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक विभागाकडून त्यांचा शोध घेतला जातो. मुले बेपत्ता होण्याची प्रकरणे पोलिसांकडून गांभीर्याने घेतली जातात, त्यामुळे त्यांचा शोध लागण्याचे प्रमाण जास्त असते.
५४२ जणांचा शोध सुरूच
जिल्ह्यातील २३८४ बेपत्ता व्यक्तींपैकी १८४२ जणांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. मात्र, अजूनही ५४२ व्यक्तींचा शोध सुरू आहे. यात २८६ महिला आणि १७ अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. यातील काही मुली आणि महिला परराज्यात गेल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
दहा महिन्यांतील बेपत्ता
व्यक्ती - बेपत्ता - मिळाले - शोध सुरू
- महिला - १४१९ - ११३३ - २८६
- पुरुष - ७१३ - ४७६ - २३७
- अल्पवयीन मुली - २०९ - १९२ - १७
- अल्पवयीन मुले - ४३ - ४१ - ०२
बेपत्ता अल्पवयीन मुले आणि मुलींचा शोध घेण्यात कोल्हापूर जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. महिला आणि पुरुषांचा शोध घेण्याचे काम सातत्याने सुरू असते. कौटुंबिक वादांमुळे काही जण परराज्यात जाऊन ओळख लपवून राहत असल्याने तपासात अडचणी येतात. - रवींद्र कळमकर - पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा