Kolhapur: पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याच्या रागातून सशस्त्र हल्ला, तरुण जखमी; पाच जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 12:12 IST2025-06-12T12:11:33+5:302025-06-12T12:12:44+5:30

आठ वाहनांची तोडफोड

Armed attack in anger over complaint lodged at police station, police escort attackers around town in Kolhapur | Kolhapur: पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याच्या रागातून सशस्त्र हल्ला, तरुण जखमी; पाच जणांना अटक

Kolhapur: पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याच्या रागातून सशस्त्र हल्ला, तरुण जखमी; पाच जणांना अटक

कोल्हापूर : एकमेकांशी पटत नसल्याने झालेल्या वादातून पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीचा राग मनात धरून पाच तरुणांनी दारूच्या नशेत आयटीआय कॉलेजच्या मागे असलेल्या सासने नगरात सशस्त्र हल्ला करून आठ वाहनांची तोडफोड केली. तसेच धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात आयुष सुनील दीक्षित (वय २०, रा. सासने नगर, कोल्हापूर) हा जखमी झाला. मंगळवारी (दि. १०) मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या घटनेनंतर जुना राजवाडा पोलिसांनी तातडीने पाच हल्लेखोरांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.

विशाल बबन जाधव-मांगुरे (वय ३०, रा. सुभाषनगर), सूरज शिवाजी गावकर (२०, रा. आरकेनगर), विपुल सदाशिव दाबाडे (२४, रा. कसबा बावडा), संतोष शिवलिंग मनगुत्ती (२१, रा. सासनेनगर) आणि शर्विन उमेश यादव (१९, रा. जरगनगर) अशी अटकेतील हल्लेखोरांची नावे आहेत.

जुना राजवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आयुष दीक्षित हा शहरातील एका कॉलेजमध्ये ॲनिमेशनचे शिक्षण घेतो. यापूर्वी गल्लीत राहणारा विशाल मांगुरे याच्याशी पटत नसल्याने दोघांमध्ये वाद होता. याच वादातून त्याने विशाल याच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली होती. याचा राग मनात धरून विशाल याने मंगळवारी मध्यरात्री त्याच्या चार मित्रांसह आयुषच्या घरासमोरील आणि गल्लीतील वाहनांची तोडफोड केली.

तसेच याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या आयुषवर धारदार शस्त्राने हल्ला चढवला. यात आयुषच्या कानाजवळ गंभीर दुखापत झाली. त्याच्या घरावरही दगडफेक झाली. गल्लीतील लोक जमा होताच हल्लेखोरांनी पळ काढला. तोडफोडीत वाहनांचे मोठे नुकसान झाले. अचानक घडलेल्या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.

यांच्या वाहनांचे झाले नुकसान

तोडफोडीत सुनील दीक्षित यांच्या दोन दुचाकी, सागर सावंत यांची एक दुचाकी, बाळू गायकवाड यांची रिक्षा, अनिल यळगुडकर, सुशांत पाटकर, ओंकार राशिनकर आणि बाळू चौगुले यांच्या कारचे नुकसान झाले. वाहनांची नुकसान भरपाई हल्लेखोरांकडून वसूल करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हल्लेखोरांना सासने नगरात फिरवले

पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने पाच हल्लेखोरांना ताब्यात घेतले. गुन्हा दाखल केला असून, बुधवारी सायंकाळी त्यांना सासने नगरात फिरवले. गुन्हा दाखल होऊ नये म्हणून त्यांनी माफी मागत पुन्हा अशी चूक करणार नसल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र, पोलिसांनी कठोर कारवाई करून अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यांना इशारा दिला.

Web Title: Armed attack in anger over complaint lodged at police station, police escort attackers around town in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.