कोल्हापूरच्या धार्मिक पर्यटनाचा मार्ग प्रशस्त होणार; अंबाबाई, जोतिबा मंदिर परिसराचे रूपच पालटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 13:02 IST2025-05-07T13:01:52+5:302025-05-07T13:02:34+5:30

कोल्हापूर : करवीरनगरीतील अंबामातेच्या मंदिर परिसराच्या एकात्मिक विकास आराखड्यास एकदाची मंजुरी मिळाली. जोडीला दख्खनचा राजा जोतिबाचाही आराखडा मंजूर झाला. ...

Approval of development plan for Ambabai, Jyotiba temples will pave the way for religious tourism in Kolhapur | कोल्हापूरच्या धार्मिक पर्यटनाचा मार्ग प्रशस्त होणार; अंबाबाई, जोतिबा मंदिर परिसराचे रूपच पालटणार

कोल्हापूरच्या धार्मिक पर्यटनाचा मार्ग प्रशस्त होणार; अंबाबाई, जोतिबा मंदिर परिसराचे रूपच पालटणार

कोल्हापूर : करवीरनगरीतील अंबामातेच्या मंदिर परिसराच्या एकात्मिक विकास आराखड्यास एकदाची मंजुरी मिळाली. जोडीला दख्खनचा राजा जोतिबाचाही आराखडा मंजूर झाला. या दोन्ही देवस्थानांच्या ठिकाणी सध्या येणाऱ्या अनंत अडचणींचा विचार करून मूलभूत सोयीसुविधा, सुशोभीकरणाच्या आधारे दोनही मंदिरांच्या संवर्धनासह परिसराचाही विकास साधण्यात येणार आहे. परिणामी कोल्हापूरच्या धार्मिक पर्यटनाचा मार्ग आणखी प्रशस्त होणार आहे.

अंबाबाई विकासासाठीच्या साडेचौदाशे कोटींच्या आराखड्याचे तीन टप्पे आहेत. बिनखांबी गणेश मंदिर ते जोतिबा रोड, जोतिबा रोड ते भाऊसिंगजी रोड, भवानी मंडप, दक्षिण दरवाजापासून ते बिनखांबी गणेश मंदिर अशा चौफेर दिशेला साडेचार एकरांत विकास आराखडा राबविण्यात येणार आहे. बिनखांबी ते महालक्ष्मी बँकेपर्यंत भुयारी मार्ग राहणार असून तेथून पुढे दोन मजल्यांचा संकलन प्लाझा असेल. तेथे दर्शन मंडप, ॲम्पी थियटर, पूजा साहित्याची दुकाने, भाविकांसाठी विश्रांती कक्ष असेल.

अंबाबाई विकास आराखड्यातील विकासकामे दहा एकरांतील असून भवानी मंडप परिसर हेरिटेज प्लाझा म्हणून विकसित करण्यात येणार आहे. तेथे पर्यटकांसाठी लाइट ॲण्ड साउंड शो असेल. अन्नछत्र, वेदपाठशाळा, प्रदर्शनासाठी हॉल असेल. विकासाच्या पहिल्या टप्प्यात मंदिराचे जतन संवर्धन, अंतर्गत सुधारणा, दर्शन मंडप, अन्नछत्र, भक्तनिवास, स्वच्छतागृह व मंदिर बाह्य परिसरातील मोजक्या इमारतींचे भूसंपादन यांचा समावेश आहे.

असा झाला आराखड्यांचा प्रवास

  • २००८/०९ मध्ये विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळांच्या विकासाचा २२०० कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला. त्याची अंमलबजावणी झाली नाही.
  • अंबाबाई मंदिर विकासासाठी २०१३ मध्ये २५० कोटींचा आराखडा
  • २०१७/१८ ला वरील आराखड्याची फोड करून १५० कोटींचा आराखडा
  • २०१९ मध्ये ८० कोटींच्या आराखड्याला मंजुरी मिळाली. पैकी १० कोटींचा निधी उपलब्ध.
  • २०२३/२४ मध्ये आणखी ४० काेटी रुपयांचा निधी प्राप्त

दोन्ही तीर्थक्षेत्रांचे आराखडे कोल्हापूरच्या भक्ती आणि अस्मितेची प्रतीके आहेत.  दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भक्तगणांना सुधारित दर्शन बारीमुळे विनासायास दर्शन होईल. पार्किंगचीही चांगली व्यवस्था होणार आहे. - हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षण मंत्री
 

हा तीर्थक्षेत्र आराखडा मंजूर व्हावा यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. त्यास यश मिळाले. प्रामुख्याने नियोजन विभागाचे सचिव देवरा यांनी गेल्या दोन वर्षांमध्ये जिल्ह्यातील कन्व्हेन्शन सेंटर, तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या मंजुरीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. - आमदार राजेश क्षीरसागर

आमदार पदाच्या पहिला टर्ममध्ये आराखड्यांना मंजुरी देण्याची आग्रही मागणी केली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे काही दिवसांपूर्वी सहपालकमंत्री माधुरीताई मिसाळ यांच्यासमवेत बैठकही घेतली. सातत्यपूर्ण पाठपुराव्याचा परिपाक म्हणून मुख्यमंत्र्यांनी भरीव निधीची घोषणा केली आहे. - आमदार अमल महाडिक

अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा निधी प्राप्त होऊन प्रत्यक्षात काम होणे अभिप्रेत आहे. यामुळे परिसरातील भाविकांना चांगल्या सुविधा उपलब्ध होतील. - आमदार सतेज पाटील

Web Title: Approval of development plan for Ambabai, Jyotiba temples will pave the way for religious tourism in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.